मानवनिर्मित पूरस्थितीला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा; बिल्डरची जबाबदारी निश्चित करा.” – राहुल कलाटे

bpcauthor
3 Min Read

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पाणी साचण्याच्या घटनांबाबत राहुल कलाटे यांची ठाम भूमिका

दि.१८(पीसीबी)-पिंपरी-चिंचवड शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गासह वाकड, ताथवडे आणि पुनावळे परिसरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याच्या घटना घडल्या. काही सोसायट्यांच्या आवारात तसेच बेसमेंटमध्येही मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.

याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक राहुल कलाटे यांनी हा विषय अत्यंत गांभीर्याने उपस्थित करत, ही परिस्थिती केवळ नैसर्गिक नसून अनेक ठिकाणी ती मानवनिर्मित असल्याचे स्पष्ट केले. तसेच महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या सुविधा अपुऱ्या आहेत, पुरेसे पंप उपलब्ध नाहीत, त्यामुळे अनेक ठिकाणी मदत करण्यासाठी आम्हाला अडचण निर्माण होत होती, तर त्याबाबत महापालिकेने विचार करावा, असे त्यांनी सांगितले. तसेच आमच्या भागात बिल्डरांना ना हरकत प्रमाणपत्र देण्याची तत्परता मनपा अधिकारी दाखवतात. त्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर येऊन पाहणी करणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी पाण्याच्या लाईन नाहीत, तरी ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलेली आहेत. त्यामुळे महानगरपालिका आयुक्तांनी बांधकाम परवानगी विभागाला यासंदर्भात सूचना द्यावता, असेही यावेळी कलाटे यांनी स्पष्ट केले.

राहुल कलाटे यांनी सांगितले की, “शहरातील विकासकामे आणि बांधकामे करताना काही ठिकाणी नैसर्गिक नाल्यांचे प्रवाह बुजविण्यात आले, जलनिस्सारणाच्या मार्गांवर अतिक्रमणे झाली किंवा योग्य नियोजन न करता बांधकामे करण्यात आली. परिणामी मुसळधार पावसात पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवला जाऊन सोसायट्या, रस्ते आणि बेसमेंटमध्ये पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत.”

विशेषतः वाकडमधील विनोदे वस्ती, ताथवडे परिसरातील ’41 Elite Krishala’, पुनावळ्यातील सियोना पेठकर सोसायटीसह अशा इतर ठिकाणी उद्भवलेल्या परिस्थितीचा सखोल अभ्यास करून ज्या ठिकाणी बांधकामातील त्रुटी, नाले बुजविणे किंवा नियोजनातील निष्काळजीपणा आढळेल, त्या प्रकरणांमध्ये सोसायटीच्या संबंधित बिल्डरची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

तसेच, एखाद्या सोसायटीच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरत असेल आणि त्यामागे बांधकामातील दोष किंवा अपुरी जलनिस्सारण व्यवस्था कारणीभूत असेल, तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित बिल्डरवर निश्चित करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राहुल कलाटे यांनी महापालिका प्रशासनाला शहरातील अशा सर्व संवेदनशील ठिकाणांची तातडीने पाहणी करून संभाव्य धोकादायक ठिकाणांची माहिती घेण्याची मागणी केली. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना त्वरित राबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

याचबरोबर महापालिका प्रशासन, संबंधित बिल्डर आणि सोसायटीचे पदाधिकारी यांना एकत्रितपणे बसवून समस्येवर कायमस्वरूपी आणि व्यवहार्य तोडगा काढण्याबाबत सांगितले.

“आज जे घडले, ते उद्या घडू नये. शहराच्या विकासाबरोबर नागरिकांची सुरक्षितता आणि मूलभूत सुविधा यांना सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. जबाबदारी निश्चित झाली तरच भविष्यात अशा निष्काळजीपणाला आळा बसेल,” असे राहुल कलाटे यांनी सभागृहात ठामपणे मांडले.

Share This Article