विशाल वाकडकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार (शहर) च्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

bpcauthor
2 Min Read

पिंपरी, दि.01-08-2026
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) च्या युवक संघटनेत सातत्याने कार्यरत असलेले युवा नेते मा. श्री. विशाल शंकर वाकडकर यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार (शहर) प्रदेशाध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष. शशिकांत शिंदे यांनी ही नियुक्ती जाहीर केली असून, त्याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे.

या नियुक्तीप्रसंगी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत तसेच महाराष्ट्राचे नेते व कर्जत-जामखेडचे युवा आमदार रोहितदादा पवार यांच्या सहकार्याने हा नियुक्ती सोहळा पार पडला. यावेळी पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विशाल वाकडकर यांनी युवकांचे विविध प्रश्न, सामाजिक उपक्रम, जनआंदोलने, लोकहिताची आंदोलने तसेच संघटन विस्ताराच्या माध्यमातून पक्षासाठी सातत्याने योगदान दिले आहे. त्यांच्या संघटन कौशल्याची, नेतृत्वक्षमतेची आणि तळागाळातील कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे.

नियुक्तीनंतर मनोगत व्यक्त करताना विशाल वाकडकर म्हणाले,
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खासदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, संसदरत्न खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे, आदरणीय जयंत पाटील साहेब, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदे साहेब, महाराष्ट्राचे नेते आदरणीय रोहितदादा पवार तसेच पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेतृत्वाने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी मनःपूर्वक ऋणी आहे.

ही नियुक्ती माझ्यासाठी केवळ सन्मान नसून एक मोठी जबाबदारी आहे. महाराष्ट्रातील युवकांना पक्षाच्या विचारांशी जोडत समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेऊन एकसंघपणे पुढे जाण्याचा माझा प्रयत्न असेल. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे विचार, राजर्षी शाहू महाराजांचा सामाजिक न्याय, महात्मा ज्योतिराव फुले यांचे समतेचे तत्त्वज्ञान आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक मूल्यांचा वारसा जपत कार्य करणार आहे. तसेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या सर्वसमावेशक विकासाच्या विचारांना मार्गदर्शक मानून युवकांना सामाजिक, राजकीय आणि वैचारिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करणार आहे.
युवकांना नेतृत्वाच्या मुख्य प्रवाहात आणणे, संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, सामाजिक प्रश्नांवर प्रभावीपणे काम करणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा राज्याच्या कानाकोपऱ्यातील युवकांपर्यंत पोहोचविणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विशाल वाकडकर यांच्या नियुक्तीचे पक्षातील वरिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांनी स्वागत केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) (शहर) संघटनेला नवी दिशा, नवी ऊर्जा आणि अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Share This Article