मोशी, दि. २९. मोशी कचरा दुर्गतनेनंतर आता स्मशानाजवळील जागेत कचरा डंपिंग सुरू केल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नगरसेविका अर्चना सस्ते यांनी थेट आयुक्ताना साकडे घातले आहे.
व्हिडिओ चित्रीकरण करून सस्ते यांनी सर्व समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.
प्रभागात “वेस्ट टू एनर्जी” प्रकल्प आहे. त्याच परिसरात मोशी स्मशानभूमी असून, आता त्याच ठिकाणी नवीन कचरा डम्पिंग सुरू करण्यात येत आहे. हा प्रकल्प आमच्या घरांपासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे आमच्या परिसरातील हजारो नागरिकांना दररोज दुर्गंधी, धूर, प्रदूषण आणि अस्वच्छ वातावरणाचा सामना करावा लागत आहे, असे सस्ते यांनी म्हटले आहे.
या कचरा डम्पिंगमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि आजारी व्यक्तींना श्वसनाचे आजार, अॅलर्जी, त्वचारोग तसेच इतर अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. आमच्या परिसरातील रुग्णालयांमध्येही दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे, अशी तक्रार त्यांनी केली.
स्वच्छ पर्यावरण आणि निरोगी जीवन जगण्याचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे असे निर्णय तात्काळ थांबवले गेले पाहिजेत.
भोसरी व पिंपरी-चिंचवड परिसरातील चारही आमदार, आयुक्त, महापौर, सत्तारूढ पक्षनेते, अध्यक्ष तसेच सर्व नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींना नम्र पण ठाम विनंती करतो की, या विषयाकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष द्यावे. नागरिकांच्या भावना, आरोग्य आणि भविष्यासाठी त्वरित योग्य निर्णय घेऊन मोशी परिसरात सुरू असलेले नवीन कचरा डम्पिंग तात्काळ थांबवावे.
ही केवळ मोशीची समस्या नाही, तर हजारो नागरिकांच्या आरोग्याचा आणि भविष्यातील पिढ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. लोकप्रतिनिधींनी राजकारणापलीकडे जाऊन नागरिकांच्या हिताचा विचार करून तातडीने कारवाई करावी, हीच सर्व मोशीकरांची अपेक्षा आहे, अशी भूमिका नगरसेविका सस्ते यांनी घेतली आहे.

