‘महाराजस्व समाधान शिबिरा”मध्ये सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी मिळणार- आमदार शंकर जगताप

bpcauthor
2 Min Read

चिंचवडमध्ये २२ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता उद्घाटन; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

चिंचवड, २१ : महसूल प्रशासन आणि आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण योजनेअंतर्गत चिंचवड विधानसभा मतदारसंघात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान २०२६’ आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर बुधवार, २२ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत आहेर गार्डन मंगल कार्यालय, वाल्हेकरवाडी, चिंचवडगाव येथे होणार असल्याची माहिती आमदार शंकर जगताप यांनी दिली.

शिबिरात जिवंत सातबारा मोहीम, उत्पन्न, वय, राष्ट्रीयत्व, अधिवास, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, नॉन-क्रिमिलेअर व जात प्रमाणपत्रांसह सातबारा उतारा, फेरफार उतारा, आधारकार्ड दुरुस्ती, वारस नोंद, खरेदी-विक्री नोंद, संजय गांधी निराधार अनुदान आणि श्रावणबाळ ज्येष्ठ नागरिक अनुदान योजनेशी संबंधित सेवा उपलब्ध असतील. याशिवाय राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना, घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष तरतूद, कुंभार समाजातील व्यक्तींना पारंपरिक व्यवसायासाठी सवलत, शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटणीपत्र वरील नोंदणी शुल्क माफी यांसारख्या योजनांचा लाभ नागरिकांना दिला जाणार आहे.

तसेच महिलांची शेतकरी म्हणून नोंद करून प्रमाणपत्रांचे वाटप, गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद, मुख्यमंत्री बळीराजा शेत व पाणंद रस्ते योजना, शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमित करणे, तुकडेबंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक क्षेत्र घोषित करणे आदी कामे केली जाणार आहेत.

चिंचवड मंडलातील चिंचवड, आकुर्डी, पिंपरी वाघेरे, रहाटणी, पिंपळे सौदागर व पिंपळे गुरव, तसेच निगडी मंडलातील किवळे, रावेत व मामुर्डी येथील खातेदार, नागरिक, मतदार आणि विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार शंकर जगताप यांनी केले आहे.

Share This Article