“ब्राह्मण कुटुंबात मी जन्माला आले; लहानाची मोठी झाले, हा काही माझा दोष आहे का?”

0
640

हा संजय आवटेंनी लिहिलेला लेख –

“ब्राह्मण कुटुंबात मी जन्माला आले; लहानाची मोठी झाले, हा काही माझा दोष आहे का?”
शर्वरी गजानन दीक्षित नावाची बावीस वर्षांची तरूण मुलगी विचारत होती.

शर्वरी डॉक्टर आहे. म्हणजे, नुकतीच झालीय.
तिचं सामाजिक- राजकीय आकलन, वाचन तेवढंच आहे, जेवढं या वयाच्या मुलांचं सरासरी आकलन- वाचन असतं.
तिला भारताचं संविधान ग्रेट वाटतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे तिला ‘मिरॅकल’ वाटतं. महात्मा गांधींमुळं इम्प्रेस होऊन सध्या ती स्वेच्छेने कोविड रूग्णांची सेवा करते आहे. अस्थायी प्राध्यापक असलेल्या एका मुलाच्या प्रेमात ती पडलीय, तो मुलगा कागदोपत्री अनुसूचित जातीतला आहे. तो आणि तिचे अन्य काही मित्र वेगवेगळ्या पुरोगामी चळवळींमध्ये काम करतात. त्या कामात तिला रस आहे. ते काम ती समजून घेते आहे. सध्या ती नेहरू वाचते आहे. तुकारामांचे काही अभंग तिनं चक्क सोप्या इंग्रजीमध्ये भाषांतरित केले आहेत.

पण, तिचा प्रश्न वेगळा आहे.
“या पुरोगामी वर्तुळात मला रोज स्वतःला का सिद्ध करावं लागतं?”

“इतरांचं पुरोगामीत्व गृहीत धरलं जातं. मला मात्र माझं पुरोगामीत्व सिद्ध करावं लागतं.”

“इतर कोणाच्या भाषेबद्दल मी काही बोलले, तर मी असहिष्णु. पण, माझी भाषा मात्र ‘ब्राह्मणी’ म्हणून चिडवलं जातं, त्यावर मी शांतपणे हसायचं.”

“थोरले बाजीराव पेशवे मला प्रचंड आवडतात. थोर पराक्रमी वाटतात. तसे मी एकदा मित्रांना सांगितले, तर लोकांनी मला उपहासाने ‘पेशवीण बाई’ म्हणायला सुरूवात केली.”

“लहानपणापासून,
“जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे॥”
हे माझं आवडतं गाणंय. ते मी छान गायलं, तर माफीवीराचं कसलं गाणं गातेस, म्हणून माझी मानहानी झाली.”
(याचा अर्थ, शर्वरीला सावरकर आवडतात, असे अजिबात नाही!)

“समर्थ रामदासांचे ‘मनाचे श्लोक’ मी शाळेत असल्यापासून रोज म्हणते, हे कळल्यावर ‘त्या लंगोट्याला कशाला सकाळी सकाळी घरात घेतेस?’, अशा शब्दांत मला चिडवले गेले.”

“कवितेतलं मला कळत नाही. पण, मंगेश पाडगावकरांची ‘बोलगाणी’ आवडतात. संदीप खरेही आवडतो. त्यांच्या काही कविता म्हटले, तर तुला बरे सगळे बामणच प्रिय. हे असले भुक्कड काही कवी आहेत का, म्हणून माझी थट्टा झाली.”

“सुबोध भावेच काय, अगदी लताबाई किंवा व.पु., पुलंही आवडत असणं हा जणू काहीतरी दोषच. माझे वडील शिक्षक. लोकमान्य टिळक माझ्या वडिलांना फार प्रिय, हाही जणू माझाच दोष.

“मी मूळची पश्चिम महाराष्ट्रातल्या एका गावची. आजही त्या गावात दीक्षित आणि रानडेंची मंदिरं आहेत. मंदिरांच्या ट्रस्टवर संस्थापक म्हणून त्यांची नावं आहेत. पण, नंतर या गावानं अशा आठवणी पुसून टाकल्या. माझे आजोबा सांगतात, गांधीहत्येनंतर उसळलेल्या दंगलीत गावागावातल्या अनेक ब्राह्मणांना हुसकावून लावलं गेलं. काहींना मारून त्यांच्या जमिनी लुबाडल्या गेल्या.
हा अन्याय मी सांगत होते, या इतिहासाचा अभ्यास करायला हवा, असं म्हणत होते, तर “बामणांवर कसला अन्याय झाला? काहीतरी बरळू नकोस”, म्हणून माझं तोंड बंद केलं गेलं.”

“मी एकदम शाकाहारी आहे. उकडीचे मोदक आणि त्यावर तुपाची धार वगैरे कसली भारी लागते, याची टवाळी, पण मटणाचे सगळे प्रकार मात्र मी कौतुकाने ऐकून घ्यायचे.”

“मराठा आरक्षण वा ओबीसी आरक्षण अशा विषयांवर मला बोलण्याची परवानगीच नाही.”

“शिवाजी महाराज किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे माझे आदर्श आहेत. त्याविषयी मी सतत वाचत असते. पण आपलं काहीतरी चुकेल आणि पुन्हा गडबड होईल, म्हणून भीतीनं त्या विषयावर मी काहीच बोलत नाही.”

“ब्राह्मण्याला, जातपितृसत्तेला, मुंजीसह सगळ्या कर्मकांडांना विरोध करते म्हणून माझ्या नातेवाईकांनी तर मला जातीतून कधीच बाहेर काढलंय.
पण, हे पुरोगामी मित्र मला पुन्हा पुन्हा जातीत ढकलताहेत, त्याचं काय करायचं?

“मी ‘शर्वरी दीक्षित’ आहे, हा अपराध आहे का माझा?”

(ही शर्वरी कोणत्या वयात, कोणत्या वैचारिक वळणावर आहे, हे लक्षात घेणं इथं जास्त महत्त्वाचं. शिवाय, तिच्या आवडीनिवडी एवढ्याच आहेत, असंही नाही. पण, अशा काही गोष्टी आवडण्यावर, मांडण्यावर एखादा अपराध केल्याप्रमाणे आक्षेप का घेतला जातो, हा तिचा प्रश्न आहे!)

ब्राह्मण असणं सोपं नाहीए, या राज्यात!
पुन्हा एकसुरी, एकसाची संस्कृती हवीय का आपल्याला? आपल्यापेक्षा वेगळा असणारा प्रत्येक सूर खोडूनच काढणार का आपण?
एक तर खरंच. जात नावाच्या विषमतेवर उभी असणारी व्यवस्था, त्या व्यवस्थेच्या कथित लाभार्थ्यांचंही नुकसानच करते.

– संजय आवटे