अवजड सह जड वाहनांना आळंदीत प्रवेशबंदी
आळंदीत लाखो भाविक येण्याची शक्यता मात्र दुष्काळाचे पार्श्वभूमीवर गर्दी कमी राहील असा ही एक अंदाज
परिसरात १२ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था, एसटी आणि पीएमपीएमएलसाठी स्वतंत्र थांबे
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्री क्षेत्र आळंदी येथे १ ते ८ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या कार्तिकी यात्रा व संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत महत्त्वाचे बदल केले आहेत. या कालावधीत आळंदी आणि देहूगावकडे जाणाऱ्या अनेक मार्गांवर जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तसेच आळंदी शहरात येणाऱ्या वाहनांसाठी विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. हे निर्बंध १ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून ८ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहतील.
४ डिसेंबर रोजी कार्तिकी एकादशी, तर ६ डिसेंबर रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा होणार आहे. या सोहळ्यांसाठी महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून सुमारे १० ते १५ लाख भाविक आळंदीत येण्याची शक्यता आहे. यातील अनेक भाविक देहू येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिर, गाथा मंदिर आणि भंडारा डोंगर येथेही दर्शनासाठी जातात. त्यामुळे आळंदी आणि देहू परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त (वाहतूक) विक्रांत देशमुख यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे.
या मार्गांवर जड वाहनांना प्रवेशबंदी –
मोशी चौक, भारतमाता चौक, चिंबळी फाटा, आळंदी फाटा, माजगाव फाटा, चाकण-शेल पिंपळगाव-वडगाव घेणंद मार्ग, पुणे-दिघी-मॅगझीन चौक आणि मरकळ मार्गावरून आळंदीकडे येणाऱ्या जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी असेल. तसेच भोसे फाटा ते आळंदी आणि देहूगावकडे जाणाऱ्या काही मार्गांवरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
या वाहनांना जय गणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक, चोविसावाडी, विश्रांतवाडी, भोसरी, मॅगझीन चौक, मोशी-चाकण-शिक्रापूर, कोयाळी कमान आणि मरकळ गाव या पर्यायी मार्गांचा वापर करून इच्छित स्थळी जाता येईल.
आळंदी शहरात प्रवेशासाठीही निर्बंध –
१ ते ८ डिसेंबरदरम्यान पुणे-आळंदी, मोशी-आळंदी, चिंबळी-आळंदी, चाकण-आळंदी, वडगाव घेणंद-आळंदी आणि मरकळ-आळंदी या मार्गांवरून आळंदीत येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना आवश्यकतेनुसार प्रवेशबंदी असेल. यासाठी चऱ्होली फाटा, डुडुळगाव जकातनाका, केळगाव चौक, बोपदेव चौक, इंद्रायणी हॉस्पिटल, विश्रांतवड, धानोरे फाटा आणि पीसीएस चौक आदी ठिकाणी वाहतूक नियंत्रण केले जाणार आहे.
भाविकांच्या वाहनांसाठी १२ ठिकाणी पार्किंग –
आळंदी आणि देहू येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी विविध ठिकाणी पार्किंग निश्चित करण्यात आली आहेत.
१. देहू रोड, तळेकर पाटील चौक (दक्षिण बाजू) – २ एकर
२. देहू रोड, तळेकर पाटील चौक (उत्तर बाजू) – १ एकर
३. आदित्य इंटरनॅशनल स्कूल, डुडुळगाव – १० गुंठे (पोलीस वाहनांसाठी)
४. ज्ञानविलास कॉलेज, डुडुळगाव जकातनाक्याजवळ – १० गुंठे (पोलीस वाहनांसाठी)
५. मुंगसे पार्किंग, बोपदेव चौक – ४.५ एकर
६. इंद्रायणी हॉस्पिटलसमोर, चाकण रोड – ९ एकर
७. विश्रांतवड, वडगाव रोड – २५ एकर
८. वडगाव चौक, आळंदी शौचालयाजवळील नगरपरिषद पार्किंग – ३० गुंठे
९. पॉलीबॉन्ड कंपनीसमोर गावडे पार्किंग – ४ एकर
१० एल्युमेरिया मंगल कार्यालय – २० गुंठे
११ बैलगाडा घाट, चऱ्होली – १ एकर
१२. मुक्ताई मंगल कार्यालयासमोर – १ एकर
एसटी आणि पीएमपीएमएलसाठी स्वतंत्र थांबे
भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी आणि पीएमपीएमएल बससाठीही स्वतंत्र थांबे निश्चित करण्यात आले आहेत. देहूगावकडे जाणाऱ्या बससाठी डुडुळगाव जकातनाका, पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बससाठी चऱ्होली फाटा, वाघोली-शिक्रापूरकडे जाणाऱ्या बससाठी धानोरे फाटा चौक येथे व्यवस्था असेल.
चाकणकडे जाणाऱ्या एसटी बससाठी हनुमानवाडी, इंद्रायणी हॉस्पिटल आणि विशाल हॉटेलसमोर थांबा असेल. शिक्रापूर, शेल पिंपळगाव आणि नगरच्या दिशेने जाणाऱ्या बससाठी विश्रांतवड, वडगाव रोड येथे थांबा निश्चित करण्यात आला आहे.
अत्यावश्यक सेवांना निर्बंधातून सूट –
जड-अवजड वाहनांच्या प्रवेशबंदीमधून अत्यावश्यक सेवेतील वाहने आणि दिंडीतील वाहनांना सूट देण्यात आली आहे. नागरिकांनी आणि भाविकांनी वाहतूक पोलिसांनी निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा. तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी केले आहे.

