पिंपरी-चिंचवड RTO मध्ये ‘नारळाचा’ कोडवर्ड! भ्रष्ट अधिकाऱ्यांचा शोध घेण्यासाठी डॉ. बाबा कांबळे नारळाचा हार घेऊन एटीएस सेंटरवर धडकले;
पिंपरी, दि. २८ पिंपरी-चिंचवड आरटीओ (RTO) तसेच राज्यातील इतर विविध आरटीओ कार्यालयांमध्ये एटीएस (ATS) सेंटरच्या नावाखाली वाहनचालकांकडून पैसे उकळून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी २३ नोव्हेंबर रोजी एटीएस सेंटरमधील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही पैसे घेतल्याशिवाय गाड्यांचे पासिंग केले जात नसल्याचे चित्र कायम आहे.
जे वाहनचालक पैसे देतात, त्यांच्या गाड्यांचे ब्रेक व फिटनेस योग्य नसतानाही त्या सर्रास पास केल्या जातात. याउलट, ज्यांच्या गाड्या सुस्थितीत व फिटनेस योग्य आहेत, त्यांनी पैसे न दिल्यास त्यांच्या गाड्या मुद्दामहून फेल केल्या जात आहेत. अशा शेकडो तक्रारी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष तथा कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. याबाबत त्यांनी पिंपरी-चिंचवड आरटीओतील संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार केली असता, त्यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही.
अखेर या भ्रष्टाचाराविरोधात डॉ. बाबा कांबळे यांनी थेट कृतीची मोहीम उघडली आहे. या रॅकेटमध्ये अधिकारी तोंडाने पैशांची मागणी न करता ‘नारळ’ हा कोडवर्ड वापरत असल्याचे उघड झाले आहे. “एक नारळ म्हणजे १,००० रुपये” असा हा कोडवर्ड असून, गाडीनुसार ‘एक, दोन, तीन किंवा चार नारळ द्या’ अशी मागणी अधिकाऱ्यांकडून केली जाते. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी डॉ. बाबा कांबळे हे स्वतः नारळाचा हार घेऊन भ्रष्ट अधिकारी शोधण्यासाठी एटीएस सेंटरवर पोहोचले. जो अधिकारी पैशांची मागणी करेल, त्याच्या गळ्यात हा नारळाचा हार घालण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
मुंबईत बैठक घेऊन ‘रेट’ ठरवणारा नेता कोण?
या संपूर्ण प्रकरणात एका मोठ्या राजकीय पुढाऱ्याचा हात असल्याचा खळबळजनक आरोप डॉ. बाबा कांबळे यांनी केला आहे. “शहरातील आमदार किंवा मंत्रीपदाचा दर्जा असणाऱ्या एका राजकीय पुढाऱ्याने मुंबई येथे बैठक घेऊन गाड्यांच्या पासिंगचे रेट ठरवले आहेत, अशी खात्रीलायक माहिती आहे. हा राजकीय व्यक्ती नेमका कोण आहे, याचा मी सखोल शोध घेणार आहे,” असे डॉ. बाबा कांबळे यांनी स्पष्ट केले.
उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे ‘नारळाचा हार घेऊन जाणार,
ही भ्रष्टाचार विरोधी मोहीम यापुढेही सुरूच राहणार असून, लवकरच आरटीओ येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांच्याकडेही नारळाचा हार घेऊन जाणार असल्याचे डॉ. कांबळे यांनी जाहीर केले. अनेकदा तक्रारी करूनही राहुल जाधव यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. उलट, येथील अधिकारी “आम्हाला राहुल जाधव यांना, परिवहन मंत्र्यांना तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील एका मोठ्या राजकीय नेत्याला पैसे द्यावे लागतात,” अशी नावे सांगून वसुली करत आहेत.
हा प्रकार अत्यंत गंभीर असून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन हा भ्रष्टाचार कायमचा मोडून काढण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार असल्याचा इशारा डॉ. बाबा कांबळे यांनी दिला आहे.

