पिंपरी दि. २८ : क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्त महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस तसेच पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकातील अर्ध पुतळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
या प्रसंगी नगरसदस्या सुप्रिया चांदगुडे, नगरसदस्य कुणाल वाव्हळकर, उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
महात्मा जोतीराव फुले यांनी शिक्षणाचा प्रसार, स्त्रीशिक्षण, सामाजिक समता आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांना विरोध करत शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी करण्यात त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा विचार समाजात रुजवला. त्यांच्या कार्याचे स्मरण करत महानगरपालिकेच्या वतीने महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले. यंदाचे वर्ष महात्मा फुले द्विजन्मशताब्दी वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. पिंपरी येथे आयोजित कार्यक्रमामध्ये शाहीर सुरेश सूर्यवंशी आसंगीकर यांनी महात्मा फुले यांचे जीवनपट उलगडणारे पोवाडे सादर करून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला उजाळा दिला. त्याकाळी घडलेले फुले दांपत्याच्या जीवनावरील अनेक प्रसंग पोवाड्यांच्या माध्यमातून शाहीर सूर्यवंशी यांनी सादर केले.

