पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर भीषण अपघात; उभ्या टँकरला दुचाकी धडकून तरुणाचा मृत्यू

PCB Admin
1 Min Read

पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील पिसुर्टी गावाजवळ झालेल्या अपघातात दुचाकीस्वार अभिजीत भगवान निगडे (वय ३८, रा. गुंजवणे, ता. पुरंदर) यांचा मृत्यू झाला. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत निगडे हे दुचाकीवरून जेजुरीकडे निघाले होते. पिसुर्टी गावाच्या हद्दीत पाटीलवाडा हॉटेलसमोर पालखी महामार्गावर रस्त्याच्या डाव्या बाजूच्या लेनमध्ये टँकर उभा करण्यात आला होता. रात्रीच्या वेळी त्याचा अंदाज न आल्याने दुचाकीची टँकरला पाठीमागून जोरदार धडक बसली.

या अपघातात अभिजीत निगडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी जेजुरी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. महामार्गावर वाहन सुरक्षित ठिकाणी उभे करण्यात आले होते का, तसेच आवश्यक सुरक्षा सूचना किंवा इशारे देण्यात आले होते का, याचीही चौकशी केली जात आहे.

Share This Article