पुण्यात FDA ची धडक कारवाई!
जुन्नरमध्ये ४७ किलो मलाई कुल्फी जप्त; एरंडवणेतील प्रसिद्ध हॉटेलचा परवाना निलंबित
अन्न सुरक्षा नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पुण्यात विशेष मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत जुन्नर तालुक्यातील कंदळी येथील ‘मे. संचिता फूड्स’ वर छापा टाकून अवैधपणे तयार केलेली ४७.५८ किलो मलाई कुल्फी जप्त करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, या युनिटकडे FSSAI चा वैध परवाना नव्हता, लेबलिंगचे नियम धाब्यावर बसवले होते आणि खाद्यपदार्थांच्या निर्मितीच्या ठिकाणी घातक अखाद्य रसायनांची हाताळणी केली जात होती. त्यामुळे एफडीएने तात्काळ कारवाई करत कुल्फीचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.
दुसऱ्या एका मोठ्या कारवाईत, पुण्यातील प्रभात रोड, एरंडवणे येथील प्रसिद्ध ‘हॉटेल लक्ष्मण’ चा अन्न परवाना (FSSAI License) एफडीएने थेट निलंबित केला आहे. हॉटेलमध्ये अन्न हाताळणी, परिसर व्यवस्थापन आणि अस्वच्छतेबाबत गंभीर त्रुटी आढळून आल्यानंतर ही कठोर कारवाई करण्यात आली. राज्यभरात दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि हॉटेलमधील भेसळ रोखण्यासाठी ही मोहीम अशीच सुरू राहणार असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरोधात कोणतीही गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा एफडीए प्रशासनाने दिला आहे.

