२९ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला अन् गजानन चिंचवडेंचे जीवन संपले ? – भाजपा पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर अत्यंत गंभीर आरोप

0
611

पिंपरी, दि.५ (पीसीबी) – शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि सहा महिन्यांपूर्वी भाजपात प्रवेश केलेले चिंचवड गावातील नेते गजानन चिंचवडे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच २९ वर्षांपूर्वी झालेल्या जमीन खरेदी प्रकरणात त्यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल झाला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने राजकीय दबाव आणण्यासाठी गुन्हा दाखल करायला लावला. त्याचा तणाव आणि मानसिक खच्चीकरण झाल्याने गजानन चिंचवडे यांचे जीवन संपले आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते हे पाप कुठे जाऊन फेडतील, असा सवाल पिंपरी चिंचवडकर करत आहेत.

शिवसेनेच्या नगरसेविका अश्विनी चिंचवडे आणि माजी जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांच्यासह दहा जणांवर २५ जानेवारी रोजी गुन्हा दाखल झाला. हा प्रकार सन १९७१ ते २०१८ दरम्यान वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे झाल्याचे पोलीस दप्तरी नोंद आहे.

पोलिस प्रशासनाच्या माहितीनुसार, १९७१ साली खरेदीखत केल्याची नोंद बेकायदेशीरपणे १९९३ साली शासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चुकीची माहिती शासन दरबारी नोंद करून वाटणीस येणारी ३६ गुंठे जमीन त्यांच्या वारसांना न देता त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नोंद आहे. याप्रकरणी चिंचवडे यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल झाला होता.

याप्रकरणात नगरसेविका अश्विनी चिंचवडे व गजानन चिंचवडे यांचा जामीन हायकोर्टात मंजूर झाला. गजानन चिंचवडे यांनी सहा महिन्यांपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंचवडे यांनी चिंचवड गावातून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची तयारीही सुरू केली होती. राजकीय दबावातून चिंचवडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्याचा फटका निवडणुकीत बसणार, अशी चिंता वाटू लागल्याने चिंचवडे गुन्हा दाखल झाल्यापासून सार्वजनिक ठिकाणी फिरकले नाहीत. मानसिक तणावात असलेल्या चिंचवडे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यात उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

पोलिस अधिकाऱ्याने २० लाख रुपये मागितले –
विशेष म्हणजे, चिंचवड गावातील राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवाराने सुमारे ३० वर्षे जुने असलेले प्रकरण बाहेर काढले. राष्ट्रवादीच्या आमदारांचा निकटवर्ती असल्यामुळे या प्रकरणात पोलीस प्रशासनावर दबाव आणण्यात आला. चिंचवडे यांना शुक्रवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्याने चिंचवडे यांना संपर्क करुन उलटसुलट चौकशी केली. हे प्रकरण मिटवण्यासाठी आणि जमीन मिळवण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी 8 ते 20 लाख रुपयांची मागणी केली. वास्तविक संबंधित जमीन खरेदी प्रकरणात तीन केस झाल्या आहेत. पोलिसांनी शहानिशा न करता गुन्हा दाखल केला. या सर्व घडामोडींमुळे चिंचवडे तणावात होते, असे कुटुंबियांचे म्हणणे आहे.

दरम्यान, याप्रकरणी पोलीस यंत्रणा तपास करीत असून, वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येत आहे. त्यानंतर सत्य परिस्थिती समोर येईल. मात्र, सध्यातरी चिंचवड गावात आणि पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, उलटसुटल चर्चांना उधाण आले आहे.

लोकांना काय वाटेल याची भीती?
चिंचवड गावठाण हा सुशिक्षित आणि सुज्ञ तसेच चौकस मतदारांचा परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरातील नागरिक लोकप्रतिनिधी म्हणून कायमच स्वच्छ आणि कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या नगरसेवकांना निवडून देतात, अशी सर्वच पक्षाच्या लोकांची मानसिकता आहे. आपल्यावर गुन्हा दाखल झाला पुढे अटक झाल्यास लोक काय म्हणतील? अशी चिंता गजानन चिंचवडे यांना सतावत होती, असे निकटवर्ती सांगतात.

शहरात सुडाचे राजकारण अन् भाजपाचा संताप…

पिंपरी- चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर प्रशासकीय ताकद वापरून भाजपाला खिंडीत पकडण्याची रणनीती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आखली जात आहे. भोसरीतील नगरसेवक राजेंद्र लांडगे, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, चिंचवड गावातील नेते गजानन चिंचवडे आणि नगरसेवक केशव घोळवे या चार नगरसेवकांवर गुन्हे दाखल करून राष्ट्रवादीने भाजपाचा बंदोबस्त केला, असा दावा राष्ट्रवादीकडून जाहीरपणे केला जातो. सूडाच्या राजकारणातून आणखी किती राजकीय बळी घेतले जाणार आहेत? असा संतप्त सवाल पिंपरी- चिंचवडकरांकडून उपस्थित केला जात आहे.