२५ वऱ्हाडींसह नवरा नवरीवर गुन्हा

0
505

पुणे, दि. २८ (पीसीबी) : सर्वात जास्त मोरांची संख्या असलेल्या शांतता प्रिय गावात डीजेच्या तालावर कर्कश आवाजावर नवरदेव स्वतः थिरकला आणि सोबत मित्रमंडळींना घेऊन. ते देखील विना मास्क, विना परवाना. हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि मग शेवटी पोलिसांना नवरा-नवरीच्या आई-वडिलांसह 20 ते 25 वऱ्हाडी मंडळी वर गुन्हा दाखल करावा लागला. ही घटना घडली आहे पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातल्या मोराची-चिंचोली गावात.

कोरोनाच्या संकटकाळात पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी लग्न समारंभात फक्त 50 लोकांंना परवानगी दिली आहे. याशिवाय मास्क, सॅनिटायझर वापरायला सांगितले आहे. मात्र असे असताना या कुटुंबाने कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे पुढे आले आहे.

डिजेच्या तालावर नवरदेव आणि त्यांचे मित्रमंडळी थिरकतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि मग पोलिसांना अखेर कारवाई करावी लागली. या व्हिडीओत नवरदेवासह ही सगळी मंडळी डिजेच्या तालावर थिरकताना दिसत आहेत. तर नवरदेवासह कोणीही मास्कचा वापर केलेला दिसत नाही, सोबत सोशल डिस्टन्सचा देखील फज्जा उडाला आहे.

गणेश आप्पासाहेब थोपटे याचं 25 जूनला लग्न होतं. लग्नात कोणीही मास्क न लावता, सोशल डिस्टन्सिंगचा वापर केला नाही. शिवाय कोणतेही वाद्य वाजवण्याची परवानगी घेतली नाही. याबाबत नवरा मुलगा व नवरी मुलीचे आई वडील यांच्यासह 20 ते 25 लोकांच्या विरोधात शिरुर पोलिसात 26 जून रोजी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती शिरुरचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापूरे यांनी दिली आहे.