१२०० मजूर त्यांच्या गावाला रवाना

0
463

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातून शेकडो परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यात निघाले आहेत. राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार पोलिसांच्या मार्फत त्यांना एसटी बसने राज्याच्या सीमारेषेवर सोडले जाते. या अगोदर त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते. पिंपरी-चिंचवडमधून आज १२०० परप्रांतीय मजूर त्यांच्या गावाकडे रवाना झाले. यातील ६०० परप्रांतीय मजुरांना छत्तीसगड, मध्यप्रदेश, नागपूर देवरी येथील सीमारेषेवर सोडण्यात येणार आहे. तर, सांगवी आणि हिंजवडी परिसरातील एकूण ५६० मजुरांना पुणे स्टेशन येथे पीएमपीएमएल बसने सोडण्यात आले असून तेथून त्यांना रेल्वेने रवाना केले जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत या मजुरांना पाण्याची बाटली आणि बिस्कीट देण्यात आले. शिवाय, प्रत्येक मजुराची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड शहरात हजारो मजूर परराज्यातून कामासाठी आलेले आहेत. अनेक वर्षांपासून ते वास्तवास असून कोरोनामुळे त्यांचा रोजगार गेला आहे. त्यामुळे ते आपल्या मूळ गावी जात आहेत. हिंजवडी परिसरातील २५४, भोसरी एमआयडिसी ३४१ परप्रांतीय मजुरांना ते मूळ राहात असलेल्या राज्याच्या सीमारेषेवर सोडण्यात येणार असून आज वल्लभनगर येथून बस रवाना झाल्या आहेत. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंठे, वल्लभनगर आगर प्रमुख पल्लवी पाटील, पोलीस उपनिरीक्षक गिरनार आदी उपस्थित होते.

सांगवी आणि हिंजवडी परिसरातील एकूण ५६० मजुरांना पुणे स्टेशन येथे पीएमपीएमएल बसने सोडण्यात आले असून तेथून त्यांना रेल्वेने सोडले जाणार आहे. हिंजवडी परिसरातील शेकडो मजूर मूळ गावी जाण्यासाठी अनेकदा रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, आज त्यांना रेल्वेने त्यांच्या राज्यात रवाना करण्यात आलं आहे.