पुणे शहरातील कोरोना ’पॉझिटीव्ह’ रूग्णांना पिंपरीतील रूग्णालयात आणणे योग्य नाही शिवाजीराव आढळराव पाटील यांची सुचना

0
340

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – देशभरात कोरोनाचे थैमान सुरू असले तरी पिंपरी – चिंचवड महापालिका प्रशासनाला कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात बऱ्यापैकी यश आले आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महापालिकेचे सध्या सुरू असलेले कामकाज समाधानकारक आहे. मात्र, असे असले तरी सध्या हॉटस्पॉट असलेल्या पुणे शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांना पिंपरी – चिंचवड महापालिका रूग्णालयात आणणे योग्य नाही, अशी सुचना शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी महापालिका प्रशासनाला केली.

शिवसेना उपनेते, माजी खासदार आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटीका सुलभा उबाळे, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या शिष्टमंडळाने कोरोनाच्या पाश्र्वभुमीवर पिंपरी – चिंचवड महापालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. तसेच महापालिकेच्या वॉर रूमला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी शिवसेनेतर्फे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायझर आणि मास्क कीटही आयुक्तांकडे सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर आढळराव यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सध्या कोरोनाचे सर्वत्र थैमान सुरू असले तरी पिंपरी – चिंचवड शहरात कोरोनाची साथ आटोक्यात आहे. इतर महापालिकांच्या तुलनेत पिंपरीत कोरोनाची साथ आटोक्यात आहे. कोरोनाच्या उपाययोजनांबाबत महापालिका प्रशासनाचे काम समाधानकारक आहे. कोरोनाचे रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही पिंपरीत चांगले आहे. पुणे शहरात कोरोनाची परिस्थिती सध्या ’आऊट ऑफ कंट्रोल’ आहे. त्यामुळे हॉटस्पॉट असलेल्या पुणे शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांना पिंपरी – चिंचवड महापालिका रूग्णालयात आणणे योग्य नाही.
कोरोनाबाबत लोकांना अद्याप गांभीर्य नाही. ग्रामीण भागातही हीच परिस्थिती आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या तालुक्यांमध्ये मुंबई, पुणे यासारख्या शहरी भागातून तब्बल सव्वालाख लोक आले आहेत. बाहेरून येणाNया लोकांनी स्वत:हून क्वॉरंटाईन होण्याची गरज आहे. गावपातळीवर याबाबत नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी गावातील शाळा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. ग्रामीण भागात हॉटेल, ढाबा सुरू करण्यास परवानगी देणे चुकीचे आहे. गेल्या चार – पाच दिवसात नागरिक सर्रास वाहने घेऊन फिरत आहेत. ट्रकमधून लोकांची वाहतुक होत आहे. मात्र, पोलीसांनीही बघ्याची भुमिका घेतली असून शासकीय यंत्रणांनी हातच टेकले आहेत, याकडेही आढळराव यांनी लक्ष वेधले.