१० हजारांची लाच स्वीकारताना लिपीक एसीबीच्या जाळ्यात

0
288

अमरावती, दि.६ (पीसीबी) – शेत अकृषक करण्यासाठी १० हजारांची लाच घेणाऱ्या मोर्शी तहसीलमध्ये कार्यरत लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.

राहुल अजाबराव देवतळे (३०) रा. राधाकृष्ण कॉलनी, मोर्शी असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर लिपिकाचे नाव आहे.

प्राथमिक माहितीनुसार, नागरिकाला आपल्या सहकाऱ्यासोबत हॉटेल सुरू करायचे होते. त्यामुळे त्यांनी मुख्य रस्त्यावरील एक एकर शेत अकृषक करून देण्यासाठी मोर्शी तहसीलमध्ये अर्ज सादर केला होता. सदर अर्ज लिपिक राहुल देवतळे यांच्याकडे आल्यावर त्यांनी तक्रारकर्त्यां नागरिकाकडे १६ हजारांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती १० हजार रुपयांवर व्यवहार ठरला. नागरिकाने लाचेची रक्कम देण्यास होकार देऊन यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने २९ जानेवारी व ३ फेब्रुवारी रोजी पडताळणी करण्यात आली. त्यानंतर तहसील कार्यालयात सापळा रचण्यात आला. लिपिक राहुल देवतळे याने तक्रारकर्त्यां नागरिकाकडून १० हजारांच्या लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कैलास सानप, अभय वाघ, चंद्रकांत जनबंधू आदींनी केली.