‘हेलिकॉप्टर टॅक्सीसेवा’; आता मुंबई–पुणे प्रवास केवळ २० मिनिटांत

0
2726

मुंबई, दि. १ (पीसीबी) – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वारंवार ट्रॅफीक जामची समस्या निर्माण होऊ लागली आहे. यावर उपाययोजना करण्याचे अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, त्यास म्हणावे तितके यश आलेले नाही. दरम्यान मुंबई –पुणे प्रवास अधिक जलद आणि सुखकर होण्यासाठी अनेक पर्यायाची चाचपणी सुरू आहे. आता या  वर्षात मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी चक्क ‘हेलिकॉप्टर टॅक्सीसेवा’ सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई ते पुणे प्रवास  केवळ २० मिनिटांत करता येणार असला तरी जादा पैसे मोजण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.  

मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई या मार्गावर  प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नोकरी, व्यवसायानिमित्त दररोज प्रवास करणाऱ्याची लक्षणीय संख्या आहे. द्रुतगती मार्गावरून प्रवास करताना वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. रेल्वेने ही प्रवास करताना अनेक मर्यादा येतात. मात्र, मुंबई-पुणे प्रवास करणे ही नागरिकांची  गरज बनली आहे. त्यामुळेच ‘हेलिकॉप्टर टॅक्सीसेवा’ सुरू करण्यात येणार आहे. यामुळे केवळ २० मिनिटांत आता मुंबईहून पुण्याला पोहोचता येणार आहे, असे सांगितले जात आहे.

मुंबई ते पुणे हे अंतर अंदाजे ७५ नोटिकल इतके आहे. हे अंतर हेलिकॉप्टर ने पाऊण तासात पार करता येते. या प्रवासासाठी १५ हजार ते १८ हजार रुपये इतका खर्च येऊ शकतो. दरम्यान, मुंबईहून पुण्यासह शिर्डी आणि इतर जवळील ठिकाणांवरदेखील ही सेवा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, ‘हेलिकॉप्टर टॅक्सीसेवा’ सुरू झाल्यास प्रवास अधिक जलद आणि सुखकर होणार असला, तरी सर्वसामान्य नागरिकांना ही सेवा आर्थिक दृष्ट्या परवडणे शक्य नाही. त्यामुळे या सेवेला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.