हिंजवडी पोलीस ठाण्यात घुसून पोलीस हवालदाराला शिवीगाळ

0
1836

हिंजवडी, दि. २५ (पीसीबी) – वृध्द इसमाला मारहाण केल्या प्रकरणी तक्रार नोंदवून घेत असताना एका आरोपीने हिंजवडी पोलीस ठाण्यात घुसून तक्रार नोंदवून घेणाऱ्या पोलीस हवालदाराला शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सोमवारी (दि.२४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हिंजवडी पोलीस ठाण्यात घडली.

याप्रकरणी पोलीस हवालदार अविनाश विठ्ठल बोराटे (वय ४६) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रविण बापु कसाळे (वय २७, रा. माण ग्रामपंचायत समोर माणगाव हिंजवडी) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हिंजवडी पोलीस ठाण्यात आरोपी प्रविण कसाळे विरोधात मारहाणीची तक्रार दाखल करण्यासाठी त्याचे वृध्द सासरे आले होते. यावेळी पोलीस हवालदार अविनाश बोराटे हे तक्रार दाखल करुन घेत होते. इतक्यात प्रविण पोलीस ठाण्यात आला. त्याने बोराटे यांना शिवीगाळ करुन, “माझ्या विरोधात गुन्हा दाखल करुन नका मी मारहाण केली नाही”, असा दम बोराटेंना दिला. तसेच गुन्हा दाखल करण्यास अडथळा निर्माण केल्याने प्रविण कसाळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रविणला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.