अटलबिहारी वाजपेयींच्या जयंतीनिमित्त १०० रुपयांचे नाणे जारी

0
723

नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) –  दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी १०० रुपयांचे नाणे जारी केले आहे. वाजपेयींच्या जयंतीच्या एक दिवस आधी पंतप्रधांनांनी या नाण्याची घोषणा केली. १६ ऑगस्ट रोजी वाजपेयींचे निधन झाले. त्यांच्या आठवणी कायम रहाव्यात यासाठी मोदींनी वाजपेयींची प्रतिमा असलेले १०० रुपयांचे नाणे जारी केले आहे.

मोदी म्हणाले की, अटल बिहारी वाजपेयींनी पक्षाच्या विचारधारेशी कधीही तडजोड केली नाही. अटलजींनी राजकीय प्रवासातील जास्त काळ विरोधी पक्षाच्या बाकावर घालवला आहे. त्यांनी नेहमी राष्ट्र हिताचाच विचार केला. या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, अर्थमंत्री अरुण जेटली आणि भाजप अध्यक्ष अमित शाह उपस्थित होते.

१०० रुपयांच्या या नाण्यावर पुढील भागात अशोक स्तंभ आणि त्याच्या खाली सत्यमेव जयते असे लिहले आहे. नाण्यावर देवनागरीमध्ये भारत आणि रोमन अक्षरांत इंडिया (INDIA)असे लिहले आहे. नाण्याच्या दुसऱ्या बाजुला अटल बिहारी वाजपेयी यांची प्रतिमा आहे. तसेच त्यांचे नाव आणि जन्म, मृत्यूचे वर्ष 1924-2018 असे कोरण्यात आले आहे.