हिंजवडीत अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई; ७ लाख ७१ हजारांचा गुटखा जप्त

0
1013

चिंचवड, दि. १४ (पीसीबी) – दुचाकीवरुन गुटखा घेऊन जाणाऱ्या एका इसमाला अटक करुन त्याच्या गोडाऊन मधील एकूण ७ लाख ७१ हजार १३२ रुपयांचा विविध कंपन्यांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज (बुधवार) पिंपरी-चिंचवड अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली.

समीर युनूस तांबोळी (वय ४५, रा. गुडलक चिकन सेंटरच्या पाठीमागे, पवारनगर, १६ नंबर बस स्टॉप, थेरगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे गुटखा विक्रीच्या गुन्ह्यास प्रतिबंध व्हावा म्हणून अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हिंजवडी परिसरात गस्त घालत होते. यावेळी त्यांना आरोपी तांबोळी हा (एमएच/१४/एफपी/३४५८) या दुचाकीवरुन पोते घेऊन जाताना दिला. पोलीसांनी त्याला थांबवून त्याच्या पोत्याची तपासणी केली असता त्यामध्ये विविध कंपन्यांचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी गुटख्यासह आरोपी तांबोळीला अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता हिंजवडीतील शिवाजी चौकातील त्याच्या गोडाऊनमध्ये आणखी गुटखा साठा ठेवल्याचे पोलीसांना सांगितले. यावर पोलिसांनी पुण्यातील अन्न व औषध प्रशासन विभागालातील अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. तसेच संयुक्तरित्या गोडाऊनवर छापा टाकून तब्बल ७ लाख ७१ हजार १३२ रुपयांचा विविध कंपन्यांचा गुटखा जप्त केला.

ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस उपनिरीक्षक वसंत मुळे, पोलीस हवालदार महाडीक, भिसे, शेलार, जंगीलवाड आणि गुट्टे यांच्या पथकाने केली.