“हा घोटाळा सिद्ध झाला असून, मुश्रीफांनी आता मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा”

0
411

मुंबई, दि.२१ (पीसीबी) : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केलीय. ‘कोरोना काळात ठाकरे सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार सुरुच होता. सामान्य जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना हसन मुश्रीफ जनतेला लुटत होते. मंत्रालय 100 टक्के बंद असताना शरद पवारांचे शागिर्द 15 हजार कोटी रुपये लुटत होते’, असा गंभीर आरोप सोमय्या यांनी मुश्रीफांवर केलाय. त्याचबरोबर हा घोटाळा सिद्ध झाला असून, मुश्रीफांनी आता मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही सोमय्यांनी केलीय.

इतकंच नाही तर हसन मुश्रीफ यांच्या जावयाला दिलेलं 1 हजार 500 कोटीचं कंत्राट अखेर रद्द करण्यात आल्याचंही सोमय्या यांनी सांगितलं. 27 हजार ग्रामपंचायतींचा TDS रिटर्न भरण्यासाठी पुढील 10 वर्षासाठी हे कंत्राट दिलं गेलं होतं. 8 महिन्यांपूर्वी मुश्रीफांचे जावई मतीन यांनी ही कंपनी विकत घेतली. जयोस्तुते कंपनीचा मागच्या 8 वर्षात एक रुपायाचंही आवक-जावक नाही. याचा सगळा पाठपुरावा केल्यानंतर आता ठाकरे सरकारनं हे कंत्राट रद्द केलं आहे. याबाबत तक्रार करायला जातानाच मला अडवण्यात आलं होतं. ठाकरे सरकार हे भ्रष्टाचारी सरकार आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचा दावा सोमय्या यांनी केलाय.

मुश्रीफांसह सोमय्या यांनी शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही निशाणा साधलाय. अनिल परब यांना नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलने हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अनधिकृत रिसॉर्टची मानली नेमकी कुणाची? परब यांना आता न्यायालयात उत्तर द्यावं लागेल. हा रिसॉर्ट अनधिकृत आहे, असं सोमय्या यांनी म्हटलंय.

संजय राऊत यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी लिहिलेल्या पत्रालाही सोमय्या यांनी उत्तर दिलंय. चौकशीचा अधिकार तुम्हालाही आहेच ना. मुख्यमंत्री चौकशी करु शकत नाहीत का? कुठे कुठे घोटाळा झालाय त्याची चौकशी करा, कारवाई करा, तुम्हाला कुणी अडवलं आहे? EOW चा विषय आहे तर मग त्यांना करु द्या चौकशी, असं आव्हानच सोमय्या यांनी राऊतांना दिलंय. तुमच्या गृहमंत्री फरार आहे त्याचं काय? असा खोचक सवालही सोमय्या यांनी यावेळी केलाय.

अजित पवार मिसगाईड करत आहेत. अजित पवार यांनी किती किंमतीला कारखाने विकत घेतले हा मुद्दा नाही. तर बोगस, बेनामी कंपनी स्थापन करुन मंत्रीपदाचा वापर करत बेनामी संपत्ती गुंतवली, याचे पुरावेही दाखवले, त्यांनी त्यावर बोलावं, असं आव्हान सोमय्या यांनी दिलंय. शरद पवार आणि अजित पवार यांनी मी जे मुद्दे उपस्थित केले त्यावर बोलावं, उगाच मुद्दा भरकटवू नये. शरद पवार, अजित पवार हतबल झाले आहेत. म्हणून कुणाची मदत मागत आहेत का? काल ईडी कार्यालयात गेलो होतो. तिथे आंदोलन केलं, त्यापेक्षा उत्तर द्या, असा खोचक टोलाही सोमय्या यांनी लगावला आहे.