“मेळावे घेणे आणि चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर देणे यापलीकडे रुपालीताईंनी महिलांसाठी केलंय तरी काय?”: शालिनी ठाकरे

0
367

मुंबई, दि.२१ (पीसीबी) : जवळपासून दीड वर्षापेक्षा अधिक काळापासून रिक्त असलेल्या राज्य महिला आयोगाला अखेर अध्यक्ष मिळाला आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपती अधिकृतपणे निवड करण्यात आली आहे. तशी माहिती खुद्द चाकणकर यांनीच बुधवारी माध्यमांना दिली होती. त्यानंतर आज चाकणकर अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहेत. अशावेळी मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी रुपाली चाकणकर यांना खोचक टोला लगावलाय.

‘सरकार स्थापन होऊन 2 वर्षांनी महिला आयोगाचा अध्यक्ष नेमण्याला मुहूर्त मिळाला ही बाब आनंदाची आहे. पण मेळावे घेणे आणि चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर देणे यापलीकडे रुपालीताईंनी महिलांसाठी केलंय तरी काय..?’ असा खोचक सवाल शालिनी ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलाय.

दरम्यान पूर्वाश्रमीच्या चाकणकर यांच्या नेत्या आणि आता विरोधी पक्षात असलेल्या चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांचं अभिनंदन केलं आहे. “रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते”, असं ट्विट त्यांनी केलं आहे. तत्पूर्वी रावणाला मदत करणारी शूर्पणखा नको, अशी भूमिका घेत चाकणकरांवर आसूड ओढणाऱ्या चित्रा वाघ यांनी चाकणकरांची निवड होताच मैत्रीला जागत त्यांचं अभिनंदन करणारं ट्विट केलं आहे.

‘2 वर्षापासून भाजपनं दिलेल्या लढ्याला यश मिळालं. राज्य सरकारला महिला आयोगाला अध्यक्ष नेमण्यास अखेर मुहूर्त सापडला. अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती झाली. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते. तसंच इतर सदस्यांची नियुक्तीही त्वरीत करावी म्हणजे कामकाज पूर्ण क्षमतेनं सुरु होईल’, असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलंय.

4 फेब्रुवारी 2020 रोजी विजया रहाटकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. विजया रहाटकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. आयोगाचे अध्यक्षपद हे राजकीय स्वरुपाचे नसल्याचं सिद्ध झालं आहे. हा माझ्या अराजकीय भूमिकेचा नैतिक विजय आहे, त्यामुळे आता हे पद स्वतःहून सोडण्याचा निर्णय घेतल्याचं विजया रहाटकर यांनी पत्रात म्हटलं होतं.