स्मार्ट सिटीच्या ऑटो क्लस्टर येथील कार्यालयास आणि १७ अभियंत्यांच्या नियुक्तीस संचालक मंडळाची मंजुरी  

0
520

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कामासाठी १७ अभियांत्रिकी पदे नियुक्त करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच तीन वर्षासाठी भाडेतत्वावर ऑटो क्लस्टर येथील दुसऱ्या मजल्यावर स्मार्ट सिटीचे कार्यालय स्थापन करण्यास आज (शुक्रवार) झालेल्या पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.   

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी संचालक मंडळाची आठवी बैठक आज महापालिकेत झाली. ही बैठक  नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी केंद्र सरकारचे प्रतिनिधी ममता बात्रा, महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते दत्ता साने, प्रमोद कुटे, नगरसेवक सचिन चिखले, महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त आर. के. पद्‌मनाभन, पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे, विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी पी. एस. खांडकेकर, सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, राजन पाटील, मुख्य वित्तिय अधिकारी जितेंद्र कोळंबे आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी व पोलीस आयुक्त यांच्या अंतर्गत कमांड कंट्रोल सेंटर आणि डाटा सेंटर करीता अस्तित्व माल येथे जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार फर्निचर, विद्युत व्यवस्था आदी बाबत करारनामा करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यास या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

स्मार्ट सिटीसाठी १७ अभियंत्यांची नियुक्ती

त्याचबरोबर स्मार्ट सिटी अंतर्गत एरिया बेस डेव्हलपमेंट भागातील कामासाठी कौशल्यपूर्ण मनुष्यबळ नियुक्त करण्यास मान्यता देण्यात आली. स्मार्ट सिटीच्या मनुष्यबळ विकास धोरणानुसार १७ अभियांत्रिकी पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी वार्षिक ९० लाख खर्च अपेक्षित आहे.