सोसायटीचे बांधकाम मुदतीत पूर्ण करून घेण्याच्या बहाण्याने सभासदांची फसवणूक..

0
216

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – सोसायटीचे बांधकाम एका बांधकाम व्यावसायिकाला देऊन त्याच्याकडून मुदतीत काम करून देण्याचे आश्वासन देऊन सोसायटीच्या पदाधिका-यांनी सोसायटीच्या सभासदांना सांगितले. ठराविक वेळेत काम पूर्ण करून न घेता बांधकाम व्यावसायिकाकडून कमिशन घेऊन सभासदांची फसवणूक केली. हा प्रकार सन 2013 ते डिसेंबर 2018 या कालावधीत मावळ तालुक्यातील वराळे गावात घडला.

 

ललित काळोखे, दत्ता इंगळे, गणेश मुढे, शरद सोनपसारे (सर्व रा. वराळे, ता. मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विकास प्रकाश साळवे (वय 34, रा. वराळे, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोसायटीच्या बांधकामासाठी सोसायटीचे पदाधिकारी अध्यक्ष ललित काळोखे, उपाध्यक्ष दत्ता इंगळे, सचिव गणेश मुढे, खजिनदार शरद सोनपसारे यांनी फिर्यादी आणि त्यांच्या सोसायटीतील 45 सभासद यांच्याकडून पैसे जमा केले. ते पैसे बिल्डर देव आणि ज्ञानेश्वर आल्हाट यांना दिले. आरोपींनी त्यांच्या मर्जीने काम या बांधकाम व्यवसायिकाला दिले. ‘आम्ही मुदतीत बांधकाम करून घेत आहोत, असे आश्वासन देऊन ते वेळेत करून घेतले नाही. बांधकामासाठी लागणारी रक्कम बिल्डरच्या नावे सभासदांच्या बँक खात्यातून देण्यास सांगितले. गणेश मुढे यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे चेकद्वारे बिल्डरकडून कमिशन घेतले. फिर्यादी आणि अन्य 45 सभासदांची आर्थिक फसवणूक व विश्वासघात केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक वालकोळी तपास करीत आहेत.