पिंपरी चिंचवडमध्ये ‘एस. टी. वाचवा संघर्ष समितीची’ स्थापना….

0
277

 आकुर्डी, दि. ३० (पीसीबी) – शहरात नुकत्याच पार पडलेल्या विविध संघटनांच्या बैठकीमध्ये ‘एसटी वाचवा संघर्ष समिती’ ची स्थापना करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.सुरेश बेरी हे होते. बैठकीला लोकजागर ग्रुप, डीवायएफआय, अंधश्रध्दा निर्मूलन समिती, पर्यावरण जागर या संघटनांचे प्रतिनिधी व काही एसटी कामगार उपस्थित होते.

 

 

एसटी कामगारांचे प्रतिनिधी योगेश शिंदे यांनी सुरवातीला एसटी संपाबाबत निवेदन केले. ते म्हणाले, “आमचा लढा पगार वाढीसाठी नसून सरकारमध्ये विलीनीकरणासाठी आहे. विलीनीकरण टाळण्यामागे सरकारचा एसटीच्या खासगीकरणाचा डाव आहे. खासगीकरण झाले तर कामगारांचे व सर्वसामान्य जनतेचे खूप हाल होतील. पिंपरी येथील वल्लभनगर आगारातल्या 200 कामगारांपैकी फक्त 25 कामगार कामावर हजर आहेत. बाकीचे सर्व संपावर आहेत. विलीनीकरणाची मागणी मान्य होईपर्यत आम्ही कोणीही कामावर जाणार नाही.”
लोकजागर ग्रुपचे डॉ.बेरी म्हणाले, इतर कामगार संघटना व जनसंघटनांनी या संपाला सक्रिय पाठिंबा व लढ्यात सहभाग दाखविण्याची गरज आहे. नुसत्या तोंडी वा लेखी पाठिंब्याने भागणार नाही. मोदी सरकारचे खासगीकरणाचे धोरण, सध्याचे महाविकास आघाडीचे सरकार राज्यात राबवीत आहे. केंद्राने पूर्वीच्या कामगार कायद्यात बदल करून उद्योगपतींना सोईस्कर असे नवीन कायदे आणले आहेत. नवीन कायद्यांमुळे कामगारांचे आणि कामगार संघटनांचे कंबरडे मोडणार आहे. या कायद्यांच्या अंमलबजावणीची तयारी महाराष्ट्र सरकारने चालविली आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी एक वर्षभर आंदोलन चालविले आणि त्यात ते यशस्वी झाले. त्याचप्रमाणे एसटी कामगारांनीही दीर्घ लढ्याची तयारी करावी. आपण जनतेला सहभागासाठी तयार करू.
यावेळी डीवायएफआय चे सचिन देसाई, पर्यावरण जागरचे गोपाळ चांदोडकर, एस टी कामगार आश्विनी गायकवाड, भारत नाईक यांनीही आपले विचार मांडले. एस टी वाचवा संघर्ष समितीची स्थापना या बैठकीत करण्यात आली. या समितीच्या वतीने एक सविस्तर पत्रक काढण्याचे ठरले. त्याचप्रमाणे शहराच्या विविध भागात कोपरा सभा घेऊन जनजागृती करण्याचेही ठरले.
या बैठकीला वरील कार्यकर्ते व्यतिरिक्त गोकुळ बंगाळ, सुधीर मुरुडकर, देवीदास बत्तलवाड, श्रीराम नलावडे, सुखानंद कांबळे, बाळासाहेब घस्ते, विकास सूर्यवंशी, संघपाल कांबळे, बंटी पाटील व संकेत भरमगुडे हे उपस्थित होते.