सोनू सूदची संपत्ती माहितीये का? रुपेरी पडद्यावर खलनायक साकारण्यासाठी सोनूला तगडं मानधन मिळतं

0
375

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – माणसाकडे संपत्ती किती आहे त्यापेक्षा त्याच्यात दातृत्व किती आहे याला जास्त महत्व आहे. देशभर चर्चेचा विषय असलेला अभिनेता सोनू सूद हे त्याचे ठळक उदाहऱण आहे. हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड, पंजाबी अशा विविध भाषांतील चित्रपटांमध्ये काम करणारा सोनू सूद कलाविश्वातील एक यशस्वी अभिनेता आहे. शेकडो कोटींची मालमत्ता असणाऱ्यांना दमडीची मदत करवत नाही, पण सोनू त्याला अपवाद आहे.

२००९ मध्ये ‘अरुंधती’ या तेलुगू चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारल्यानंतर त्याच्या करिअरला एक वेगळंच वळण मिळालं. या चित्रपटामध्ये खऱ्या अर्थाने त्याच्या अभिनयाचा कस लागला आणि त्यानंतर टॉलिवूड व बॉलिवूडमध्ये त्याला दमदार भूमिका मिळू लागल्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या चित्रपटांमुळे नाही तर त्याच्या मदतकार्यामुळे तुफान चर्चेत आहे. स्थलांतरित मजुरांना, कामगारांना घरी पोहोचवण्याचं काम सोनू सूद करतोय. या मजुरांना त्यांच्या घरी सुखरुप पोहोचण्यासाठी जमेल तितकी मदत करण्याचं आश्वासन त्याने दिलंय. त्यामुळे पडद्यावरचा खलनायक आता खऱ्या आयुष्यात ‘हिरो’ बनला आहे.

सोनू सूदची एकूण संपत्ती
कलाविश्वात सोनू सूदला जवळपास २१ वर्षे पूर्ण झाली आहेत. आता पडद्यावर खलनायक साकारण्यासाठी सोनूला तगडं मानधन मिळतं. ‘रिपब्लिक वर्ल्ड’ने दिलेल्या वृत्तानुसार, सोनू सूदची एकूण संपत्ती १३०.३३९ कोटी रुपये इतकी आहे.

सोनू सूदचं करिअर
१९९९ मध्ये सोनू सूदने ‘कल्लाझागर’ या तामिळ चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं. २००९ पर्यंत त्याने जवळपास २५ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. मात्र २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अरुंधती’ चित्रपटानंतर त्याची अभिनेता म्हणून बनलेली प्रतिमा पूर्णपणे बदलली. सोनू सूदने ‘दबंग’ या चित्रपटात सलमानसोबत काम केलं होतं. ‘विष्णूवर्धना’ हा त्याचा दाक्षिणात्य चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. या कन्नड चित्रपटाने जवळपास २५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.