सेवकांनी केलेल्या ब्लॅकमेलिंगला कंटाळूनच भय्युजी महाराजांची आत्महत्या; पोलिसांकडून कोर्टात रिपोर्ट सादर

0
699

इंदूर, दि. १९ (पीसीबी) – तिघा सेवकांनी केलेल्या ब्लॅकमेलिंगला कंटाळूनच भय्यू महाराजांनी आत्महत्या केल्याचे मध्यप्रदेश पोलिसांनी केलेल्या चौकशीत समोर आले आहे. याप्रकरणी सोमवारी (दि.१८) आझादनगर पोलिस अधीक्षक सुरेंद्र सिंह तोमर यांनी ३६६ पानांचा रिपोर्ट कोर्टात सादर केला.

या रिपोर्टमध्ये भय्यू महाराजांच्या आत्महत्येसाठी सेवक विनायक दुधाळे, पलक पुराणिक आणि शरद देशमुख हे तिघे जबाबदार असल्याचे म्हटले आहे. तसेच या तिघांवर ब्लॅकमेलिंगचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे, बळजबरी वसूली करणे आणि मालमत्ता बळकावून घेण्याचा षडयंत्र रचल्याचे आरोप देखील दाखल कऱण्यात आले आहेत.

मध्यप्रदेश पोलिसांनी या प्रकरणात तब्बल १२५ लोकांची चौकशी केली, २८ लोकांचा जबाब नोंदवला तर १२ साक्षीदारांची तीन वेळा उलटतपासणी केली. त्यातून या तिघांनी मिळून दोन वर्षे महाराजांची मालमत्ता बळकावण्याचा कट रचला असे स्पष्ट झाले आहे. पलक, विनायक आणि शरद हे तिघे महाराजांना डिप्रेशनमध्ये मुद्दाम हायडोस औषधी देत होते. यानंतर अश्लील चॅट आणि संवाद करून त्यांना आपल्या जाळ्यात अडकवण्यात आले होते. तसेच आरोपींनी भय्यूजी महारांना हायडोस देऊन आत्महत्येच्या ठिकाणी सापडलेली सुसाइड नोट आगोदरच लिहून घेतल्याचेही पोलीसांचे म्हणने आहे.

धक्कादायक म्हणजे सेवक पलक महाराजांसोबत विवाह करू इच्छित होती. परंतु, भय्यू महाराजांचा विवाह डॉ. आयुषीसोबत झाला. लग्नाच्या दिवशीच पलकने वाद घातला आणि त्यांना १६ जून पर्यंत विवाहाचा अल्टिमेटम दिला होता. यामुळे विनायक आणि पलक लग्नानंतर भय्यू महाराजांकडून दीड लाख रुपये महिना घेत होते. तसेच तिघांनी मिळून महाराजांकडून कोट्यवधी रुपये लुटले होते. तिघांनी आश्रमाची संपूर्ण मालमत्ता बळकावण्यासाठी तिजोरीतील सामग्री आणि हिशोब सुद्धा आपल्या हातात घेतला होता.