राष्ट्रवादीचे नेते रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?

0
674

मुंबई, दि.१९ (पीसीबी) –  राष्ट्रवादी काँग्रेसचे  खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी  सोमवारी रात्री उशिरा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या दोघांचीही ही पहिली भेट नव्हती. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या दिवशीही रणजितसिंह मोहिते पाटील गिरीश महाजनांसोबत दिसले होते. यामुळे रणजितसिंह यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना बळ मिळत आहे.

येत्या एक-दोन दिवसात रणजित सिंह मोहिते पाटील मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले  जात आहे. यामुळे माढ्यामध्ये राष्ट्रवादीला लोकसभेचा उमेदवार निश्चत करण्याआधी धक्का बसण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही यादीत मोहिते-पाटलांचे नाव  नसल्याने  मोहिते पाटील कुटुंबामध्ये अस्वस्थता पसरली आहे.  विजयसिंह मोहिते-पाटलांनी आज (मंगळवार) अकलूजमध्ये महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीला मोहिते पाटील समर्थक या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मोहिते-पाटील या बैठकीनंतर कोणती भूमिका  घेतात,  याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.