सिल्वर ओक हल्ला प्रकरणात पत्रकारांचीही होणार चौकशी

0
360

मुंबई , दि. ११ (पीसीबी) : एस.टी. कामगारांनी विलीनीकरणाची मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर हल्ला केला होता. यावरून राज्यभरात गदारोळ उडाला आहे. आता या प्रकरणात आणखी काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच, काही पत्रकारही पोलिसांच्या रडावर आलेे असून, त्यांची चौकशी केली जाणार आहे.

पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरणी एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे. ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. पवारांच्या घरावर हल्ला करणारे 110 एसटी कामगार न्यायालयीन कोठडीत आहेत. आता या प्रकरणी आणखी काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात दोन ते तीन एसटी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे समजते. त्यांना आज गिरगाव येथील न्यायालयात पोलीस हजर करणार आहेत. दरम्यान, सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

याचबरोबर काही पत्रकारही पोलिसांच्या रडारवर आले आहेत. कारण हल्ला घडला त्यावेळी पत्रकारही हजर होते. त्यामुळे त्यांना आधीच हल्ल्याची पूर्वकल्पना होती, असा दावा केला जात आहे. त्यांना हल्ल्याची माहिती आधीच कोठून मिळाली, याची चौकशी पोलिसांकडून केली जाण्याची शक्यता आहे. पवार यांच्या घरावर हल्ल्याची माहिती आधीपासून कोणत्या पत्रकारांना होती, याचा तपास सुरु आहे. या पत्रकारांचा जबाबही नोंदवला जाणार आहे. पोलिसांकडून यासाठी सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे. त्यामुळे या पत्रकारांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.

पवारांच्या घरावरील हा हल्ला म्हणजे राज्याच्या गृह विभागाचे अपयश असल्याच्या चर्चा सुरु आहेत. सर्वपक्षीय नेत्यांकडून पोलीस काय करत होते? पोलिस कमी पडले, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पोलीस कमी पडल्याची कबुली देत आपल्याच पक्षाच्या गृहमंत्र्यांवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की, हल्ल्यामागचा सूत्रधार पोलीस शोधत आहेत. या प्रकरणात पोलीस कुठेतरी कमी पडले. पोलिसांच्या हलगर्जीपणाबाबत वरिष्ठ माहिती घेत आहेत. कारण माध्यमांना माहिती मिळते, पण पोलिसांना का मिळत नाही? हा प्रश्न आहे.