सिमरनजीत, मनिषाचाही सुवर्ण पंच

0
336

नवी दिल्ली, दि.२1 (पीसीबी) – भारताच्या सिमरनजीत कौर (६० किलो), मनिषा मौन (५७ किलो) यांनी कलोन विश्वकरंडक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. भारताने या स्पर्धेत एकूण ९ पदकांची कमाई केली. अंतिम फेरीच्या लढतीत मनिषाने आपल्याच देशाच्या साक्षी चौधरीला ३-२ असे पराभूत केले. सिमरनजीतला जर्मनीच्या माया क्लेईनहंस हिने प्रतिकार केला. सिमरनजितने लढत ४-१ अशी जिंकली.

या स्पर्धेत भारताची कामगिरी विलक्षण राहिली. तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि चार ब्रॉंझ अशा एकूण ९ पदकासह भारताने दुसरे स्थान पटकावले. पुरुष विभागात अमित पंघल (५२ किलो) सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला होता. त्याला अंतिम फेरीत जर्मनीच्या प्रतिस्पर्ध्याने पुढे चाल दिली. अनुभवी सतिश कुमार यानेही ९१ किलोवरील वजन गटात अंतिम फेरी गाठली होती. मात्र, त्याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. सोनिया लॅथर (५७ किले), पूजा राणी (७५ किलो), गौरव सोळंकी (५७ किलो), मोहंमद हुस्सामुदिन (५७ किलो) यांनी ब्रॉंझपदक मिळविले. या स्पर्धेत जर्मनी, बेल्जियम, क्रोएशिया, डेन्मार्क, फ्रान्स, मोल्डोवा, नेदरलॅंडस, पोलंड, युक्रेन या देशातील स्पर्धक सहभागी झाले होते.