कोरोनाच्या नव्या प्रकाराने जग चिंतेत

0
350

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – नव्या वर्षात लस आल्यानंतर कोरोनाची संपुष्टात येण्याची आशा असतानाच कोरोनाच्या नव्या प्रकाराने जगाची चिंता वाढवली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला असून, त्याच्या प्रसाराचा वेगही जास्त असल्याचं म्हटलं जात आहे. या नव्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. विषाणूच्या नव्या प्रकारामुळे भारतही सर्तक झाला असून, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज तातडीची बैठक बोलावली आहे. युरोपमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणुंमुळे सर्वजण गोंधळले आहेत.

देशात करोनाचा प्रसार कमी होत आहे. दुसरीकडे लवकरच लसही येणार आहे. तीन कंपन्यांनी त्यासाठी अर्ज केला आहे. असं असतानाच कोरोनानं पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये सरकारला पुन्हा कडक लॉकडाउन लागू करावा लागला आहे. वेगानं पसरत असलेल्या या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आला असल्याचं ब्रिटन सरकारनं म्हटलं आहे.

ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे जगभरातील देशांची चिंता वाढवली आहे. ब्रिटनसह नेदरलॅड, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलियातही कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला असल्याचं बीबीसीनं जागतिक आरोग्य संघटनेच्या हवाल्यानं म्हटलं आहे. कोरोनाच्या या नव्या प्रकारामुळे भारतही सर्तक झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं तातडीची बैठक बोलावली आहे. आज ही बैठक होत असून, आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधीही या बैठकीत सहभागी होणार असल्याचं एम्सच्या तज्ज्ञांनी सांगितलं.

संयुक्त देखरेख गटाची आरोग्य सेवा महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या या नव्या प्रकाराबद्दल या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. रोडरिको ऑफ्रिन हे सुद्धा संयुक्त देखरेख गटाचे सदस्य आहेत.