सिंचन घोटाळा; अजित पवारांबाबत भूमिका न्यायालयात स्पष्ट करू – मुख्यमंत्री  

0
1174

नागपूर, दि. ११ (पीसीबी) – सिंचन घोटाळा प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समावेशासंदर्भात मुंबईच्या न्यायालयात सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही पवार यांच्या समावेशासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासंदर्भात लवकरच प्रतिज्ञापत्र  सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

नागपुरात  दिवाळी मिलन समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले की, आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेबरोबर  युती करण्यास आमची तयारी आहे. त्यामुळेच युतीवरील  प्रेम आम्ही वेळोवेळी प्रगट करत असतो. मात्र, शिवसेनेचे भाजपवरील प्रेम लपून बसले आहे. परंतु काळजी करण्याची गरज नाही, ते योग्य वेळी व्यक्त होईलच, असे सांगून युतीसाठी  मातोश्रीवर बैठक आयोजित केली तरी आमची हरकत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याबाबतचा  प्रस्ताव युतीच्या काळात  केंद्र सरकारकडे पाठवला होता. त्यावेळी काही अडचणी आल्यामुळे त्यावर चर्चा झाली नाही, असे ते म्हणाले. मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनापूर्वी करण्याचा  प्रयत्न  आहे. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमबरोबर युती केल्यामुळे त्याचा भाजपला फायदा होईल असे काही नाही, असेही  मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.