सारथीवरिल तक्रारी विनाकारवाई बंद करण्याबाबत

0
337

पिंपरी, दि.०५ (पीसीबी) : गेली 5 वर्षे मी आपणाकडे अनेकदा तक्रारी केल्या की सारथी प्रणाली वरील बहुतांश तक्रारी विना कार्यवाही बंद केल्या जात आहेत तरी संबंधित कामचुकार अधिकाऱ्यांवर अद्याप काहीच कारवाई होत नाहीये.

तक्रारी कार्यवाही न करताच बंद करण्यात येतात किंवा पावसाळा संपल्यानंतर स्पीडब्रेकर दुरुस्त करण्यात येईल असे सांगून तक्रारी बंद केल्या आहेत. पूर्वीही अश्या कामचुकारपणा बद्दल मी आयुक्तांकडे तक्रारी केल्या आहेत परंतु कारवाई शून्य. W41455, W41456, W41459 या तीन तक्रारी काही दिवसांपूर्वीच संजय घुबे यांनी काहीही कार्यवाही न करता बंद केल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी वेळ लागणार असल्यास ती Hold स्टेट्स मध्ये ठेवण्यात यावी (ते IT विभागाने ऍड करावे) जेणेकरून त्यावर पुढील कार्यवाही होऊ शकेल.

नागरिकांना आपल्या छोट्या मोठया तक्रारी थेट प्रशासनापर्यंत पोचविण्यासाठी सारथी प्रणाली खूपच उपयुक्त आहे परंतु अनेक कामचुकार अधिकारी त्यांच्याकडे आलेल्या तक्रारी त्यावर कार्यवाही बंद करत आहेत.
गेंड्याची कातडी पांघरलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सारथीचे वाटोळे. अशा बेजबाबदार, कर्तव्यशून्य अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा.

२०१२-१३ मध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सुरु केलेल्या सारथी हेल्पलाईनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. नागरिकही उस्फुर्तपणे विविध तक्रारी करत होते. डॉ. श्रीकर परदेशी हे पारदर्शक कारभार करत असल्याने भ्रष्ट अधिकाऱ्यांवर व लोकप्रतिनिधींवर त्यांचा अंकुश राहत होता. सारथीवर करण्यात आलेल्या तक्रारींचे योग्य निराकरण होत होते. मात्र त्यांची बदली होताच, सारथीचे वाटोळे झाले असून, महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी गेंड्याची कातडी पांघरून नागरिकांना वेठीस धरण्याचा उद्योग सुरू केला आहे

महापालिकेच्या सारथीवर गेल्या ७-८ वर्षांत मी १०० पेक्षा जास्त तक्रारी या केवळ बेकायदेशीरपणे व IRC चे निकष धुडकावून दोन्ही बाजूला पुरेसा स्लोप नसलेले, ठराविक लांबी, रुंदी, उंची नसलेले जीवघेणे गतिरोधक उभारल्याबद्दल केल्या आहेत. या तक्रारींपैकी एकाही तक्रारीवर पालिकेच्या मुजोर कामचुकार व भ्रष्ट अधिकाऱ्यांनी कार्यवाही केलेली नाही व प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे देउन त्या बंद केल्या आहेत. बंद केलेल्या तक्रारींसारख्याच नवीन तक्रारी केल्यावर त्या डुप्लिकेट म्हणून बंद केल्या जातात. पण मूळ तक्रारींवर काहीच कार्यवाही झालेली नाही याकडे साफ दुर्लक्ष केले जाते. अश्या प्रकारे तोंड दाबून बुक्क्यांचा मार दिल्यासारखे प्रशासकीय अधिकारी मुजोर गेंड्याच्या कातडीचे झाले आहेत.

तत्कालीन महापालिका आयुक्त परदेशी यांची २०१४ ला बदली झाल्यानंतर मुजोर कामचुकार व भ्रष्ट अधिकाऱ्यांना पुन्हा रान मोकळे झाले असून, मुजोरी खूपच वाढली आहे. गेल्या काही वर्षांत मी सारथीवर २०० पेक्षा जास्त तक्रारी विविध नागरी समस्यांसाठी केल्या परंतू, निम्म्यापेक्षा अधिक तक्रारींची दखल न घेता, काम 10-15 दिवसांत, महिनाभरात होईल अशी कारणे देउन या तक्रारी बंद करण्यात आल्या आहेत.

आतापर्यंत बेकायदेशीरपणे उभारलेल्या स्पीडब्रेकर्समुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे व अनेक जण जखमी झाले आहेत. त्याबद्दल संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करुन कारवाई होणे गरजेचे आहे. म्हणून यासाठी पुण्याचे पोलीस आयुक्त व डी. सी. पी. पिंपरी चिंचवड यांना गेल्या तीन-चार वर्षांत अनेक ईमेल करुन असे जीवघेणे स्पीडब्रेकर्स उभारणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांवर खूनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल करावेत म्हणून पाठपुरावा करत आहे. पण, अद्याप कोणीही याची दखल घेतलेली नाही. आपण यात तातडीने लक्ष घालावे व कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.