साईना, श्रीकांत ऑलिंपिकला मुकणार

0
182

नवी दिल्ली, दि.१३ (पीसीबी) : मलेशिया ओपन पाठोपाठ आता सिंगापूर ओपन बॅडिमंटन स्पर्धाही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे भारताचे बॅडमिंटनपटू साईना नेहवाल आणि किदांबी श्रीकांत या वेळी ऑलिंपिकमध्ये खेळू शकणार नाही.

ऑलिंपिक बॅडमिंटन पात्रतेसाठी सिंगापूर ओपन ही अखेरची संधी होती. करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे आधीच या दोन प्रमुख खेळाडूंवर ऑलिंपिक पात्रतेची टांगती तलवार कायम होती. आता सिंगापूर स्पर्धाही रद्द झाल्यामुळे त्यांचा ऑलिंपिक पात्रतेचा अखेरचा दुवाही निखळला आहे. बीजिंग २००८ ऑलिंपिकनंतर प्रथमच साईना ऑलिंपिकमध्ये दिसणार नाही.

जागतिक बॅडमिंटन महासंघ आणि सिंगापूर बॅडमिंटन संघटना यांनी एकत्रित ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेता. स्पर्धा १ ते ६ जून या कालावधीत होणार होती. सर्व स्पर्धकांसाठी सुरक्षित आणि आरोग्यदायी वतावरण असावे यासाठी संयोजक आणि जागितक महासंघाने हर तऱ्हेने प्रयत्न केले. पण, एकूणच कोविड १९ संसर्गाच्या घटना सातत्याने वाढतच असल्याने खेळाडूंच्या प्रवासाचाही प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे खेळाडूंचे आरोग्य आणि सुरक्षा लक्षात घेता स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेत आहोत, असे संयुक्त पत्रक जागतिक महासंघ आणि सिंगापूर संघटनेने काढले.

हे पत्रक काढताना स्पर्धेचे नव्याने नियोजन करण्यात येणार नाही हे देखिल जागतिक संघटनेने स्पष्ट केले आहे. ऑलिंपिक स्पर्धा ठरल्याप्रमाणे पार पडणार असतील, तर कुठलीही स्पर्धा घेण्यास वेळच नाही. त्यामुळे साईना आणि श्रीकांतासाठी या वेळी ऑलिंपिकचे दरवाजे बंदच राहणार आहेत.