जपानी शहरांचा परदेशी खेळांडूंच्या यजमानपदास नकार

0
381

टोकियो, दि.१३ (पीसीबी) : कोविड १९ संसर्गाची भिती आता चांगलीच पसरू लागली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती जपान सरकारच्या मदतीने कितीही ऑलिंपिक घेण्यास तयार असले, तरी जपानमधील शहरे परदेसी खेळाडूंना स्विकारायला तयार नाहीत. येथिल निक्केई दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार जपानमधील डझनभर शहरांनी परदेशी खेळाडूंचे यजमानपद स्विकारण्यास नकार दिला आहे.

यातही खेळाडूंचे स्वागत करणारी शहरे अधिक आहेत. जपानमधील ५२८ शहरांनी आतंरराष्ट्रीय धावपटूंचे स्वागत करण्याची तयारी दर्शविली आहे. केवळ ४० शहरांनी ऑलिंपिक संघाच्या तयारी किंवा प्रशिक्षण शिबिरास सहाकार्य न करण्याचा निर्णय घेतला आहे.

इबाराकी परगण्याचे गव्हर्नर काझुहिको ओईगावा यांनी बुधवारी ऑलिंपिक खेळाडूंसाठी सुसज्ज बेडसह रुग्णालय सज्ज ठेवण्याची आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची मागणी फेटाळून लावली. आम्ही आधी आमच्या शहरवासियांची काळजी घेऊ त्याननंतर शक्य झाल्यास ऑलिंपिक खेळाडूंचा विचार करू असे ओईगावा यांनी सांगितले. कोविडचे परिस्थिती अशीच चिघळत गेली, तर गेल्यावर्षी स्पर्धा पुढे ढकलण्याचा तरी निर्णय घेतला गेला. पण, या वेळी स्पर्धा रद्दच कराव्या लागतील अशी भिती त्यांनी व्यक्त केली.

विशेष म्हणजे नकार येण्यापूर्वीच अमेरिका ट्रॅक अॅंड फिल्ड संघाने आपले जपानमधील पूर्व ऑलिंपिक सराव शिबिर गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ऑलिंपिक आयोजनासमोरील अडचणी वाढल्याचे चित्र निश्चितपणे समोर आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती हे स्विकारण्यास तयार नाही. कोविड १९ विषाणूच्या संसर्गाची नागरिकांमध्ये असलेली भिती आम्ही समजू शकतो. आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत. पण, म्हणून ऑलिंपिक स्पर्धा पुन्हा पुढे ढकलल्या जातील किंवा रद्द केल्या जातील असा होत नाही. टोकियो ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन हे ऐतिहासिक ठरेल आणि हा सोहळा न भुतो न भविष्यती असा सुरेख ठरेल, असे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे म्हणणे आहे.

जपानमध्ये कोविड १९ च्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आता तेथिल वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. अशा वेळी ऑलिंपिकवर खर्च करण्यापेक्षा सामाजिक बांधिलकी जपून स्पर्धेवर होणारा खर्च टाळून तो येथील आरोग्य सुविधेसाठी वापरावा असे जपानी नागरिकांचे म्हणणे आहे. स्पर्धे दरम्यान या विषाणू संसर्गाचा स्फोट होण्याची भिती जपानी नागरिकांना वाटत आहे. मात्र, स्पर्धा संयोजक हे या कालावधीत खेळाडूंच्या लशीकरणाची योजना राबविण्यात गर्क आहेत. जपान शहराला देण्यात आलेली लस २५०० ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक खेळाडूंसाठी वापरण्याचा जपान सरकारचा प्रयत्न आहे.

जपान सरकार तेथील नागरिकांना आरोग्य सुविधा देत नाहीत, अशी तक्रार आहे. त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत लशीकरणाचा वेग केवळ २.८ टक्केच इतका आहे. जपानमध्ये बुधवारी ७ हजार नवे रुग्ण आढळले. यातील ९६९ रुग्ण हे एकट्या टोकियो शहरातील आहेत.