रेयाल माद्रिद, बार्सिलोना, युव्हेंटसच्या चौकशीचे आदेश

0
338

स्वित्झिर्लंड, दि.१३ (पीसीबी) – युरोपियन फुटबॉल क्षेत्रात नवी चूल मांडण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी युरोपियन फुटबॉल महासंघाने रेयाल माद्रिद, बार्सिलोना एफसी आणि युव्हेंटस या तीन प्रमुख क्लबच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. स्वतंत्र चौकशी निरीक्षक या तीन क्लबची चौकशी करणार आहे.

युरोपियन सुपर लीगची नव्याने मोट बांधताना १२ संघ होते. त्यानंतर युईएफएचा ठामपणा आणि त्यांना फिफाने दिलेला पाठिंबा तसेच चाहत्यांनी दिलेला इशारा यामुळे हे बंड ४८ तासां फुटले. केवळ युव्हेंटस, बार्सिलोना आणि रेयाल माद्रिद हे तीनच संघ शिल्लक राहिले आहेत.

या तीन क्लबच्या चौकशीसाठी युईएफएच्या नितीशास्त्र आणि शिस्तपालन समितीच्या अधाकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. सुपर लीगची घोषणा करताना या तीन क्लबने युईएफएची कायद्याची चौकट मोडली. याच त्यांच्या शिस्तभंगाची चौकशी केली जाणार आहे.

गेल्याच आठवड्यात युईएफएने या तीन क्लबच्या चौकशीचे सुतोवाच केले होते. आता त्यांनी आपला निर्णय प्रत्यक्षात आणला आहे. त्यामुळे आता फुटबॉल जगतावर आतापर्यंत वर्चस्व राखणाऱ्या या क्लबच्या आस्तित्वाचा प्रश्न नव्याने उभा राहिला आहे.