सदगुरूनगर येथील तलावाच्या सिमाभिंतीची तात्काळ दुरुस्ती करा : नगरसेवक राजेंद्र लांडगे

0
227

– पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन

पिंपरी, दि. 4 (पीसीबी): भोसरी-सदगुरूनगर येथील  तलावात बुडून लहान मुलाचा मृत्यू झाला. सीमा भिंतीची पडझड झाल्यामुळे लहान मुले आत प्रवेश करीत आहेत. त्यामुळे प्रशासनाने संबंधित सीमाभिंतीची तात्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी भाजपा नगरसेवक राजेंद्र लांडगे यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, भोसरी येथील सद्गुरूनगर, चक्रपाणी वसाहतीलगतच्या सीमा भिंतीची पडझड झाली आहे. सीमा भिंतीच्या आतील तलावात लहान मुले, तरुण पोहण्यासाठी जातात. तलावातील पाण्याची पातळी जास्त असते. गाळ साचल्याने लहान मुलांचे पाण्यात बुडून मृत्यू होण्याचे प्रसंग घडतात. सोमवारी या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांपैकी एका मुलाचा पाण्यात बुडून झाला. केवळ सिमाभिंत व्यवस्थित नसल्याने असे प्रकार वारंवार घडताना दिसत आहेत.

अनेकदा लहान मुलांवर पाण्यात बुडण्याचे प्रसंग आल्यास त्यांना वाचविण्यासाठी आसपास कोणीही नसते. त्यामुळे सीमा भिंतीची दुरुस्ती करण्याची येथील रहिवाशांची मागणी आहे. मात्र अद्यापही याबाबत दखल घेतली गेली नाही. याशिवाय या सीमा भिंतीलगतच्या परिसरात पाल, झोपडी टाकून लोक राहत आहे. हे लोक व्यवसायानिमित्त बाहेर गेल्यानंतर, लहान मुले सीमा भिंतीच्या आतील तलावाकडे पोहण्यासाठी जाताना दिसतात. सीमा भिंतीच्या आतमध्ये जनावरे चरण्यासाठी व पाणी पाजण्यासाठी नेताना दिसतात. जनावरांसोबत लहान मुले असल्याचे दिसते. लहान मुलांना पोहताना तलावातील पाण्याचा अंदाज लागत नसल्याने पाण्यात बुडून मृत्यू होण्याचे प्रसंग वाढत आहेत.

सद्गुरूनगर व चक्रपाणी वसाहत येथे राहणारे बहुतांश कुटुंबांचे हातावरील पोट आहे. त्यामुळे नवरा-बायको कंपनीत व मोलमजुरीसाठी जातात. शाळा बंद असल्याने मुलांना घरीच सोडून जावे लागते. घरी आई-वडील नसल्याने लहान मुले सहजरीत्या तलावाकडे जात आहेत.याबाबत गांभीर्याने विचार करण्यात यावा. तातडीने तलावाच्या सीमाभिंतीची झालेली पडझड दुरुस्त करावी, अशी आमची आग्रही मागणी आहे, असेही नगरसेवक लांडगे यांनी म्हटले आहे.