सत्तेसाठी पक्ष बदलणे माझ्या स्वभावात नाही; एकनाथ खडसेंचा राधाकृष्ण विखेंना टोला

0
448

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – विरोधी पक्षात असताना काँग्रेसकडून अनेकदा ऑफर आल्या होत्या, मात्र सत्तेसाठी पक्ष बदलणे माझ्या स्वभावात नाही, असे सांगून माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काँग्रेसला रामराम करून कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणारे राधाकृष्ण विखे पाटील यांचे नांव न घेता टोला लगावला. 

एकनाथ खडसे म्हणाले की, आपला पक्ष सत्तेत आहे, याचेच समाधान आहे. मंत्रिमंडळात समावेश झाला नाही म्हणून दुसऱ्या पक्षात जाणार नाही. विरोधी पक्षात असताना काँग्रेसकडून अनेकदा ऑफर आल्या, परंतु सत्तेसाठी पक्ष बदलणे माझ्या स्वभावात नाही. सत्ता आली की सत्तेचे गुण अवगुण पक्षाला लागतात. आता मंत्रिमंडळात जाण्याचा उत्साह नाही, अशी  त्यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, भोसरी भूखंड प्रकरणात आरोप झाल्यावर एकनाथ खडसे यांना मंत्रिपदावरून काढले होते.  या प्रकरणात क्लीनचीट मिळाल्यानंतर खडसेंचे मंत्रिमंडळात पुनरागमन होईल,  अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, आजच्या विस्तारातही त्यांना डावलण्यात आले आहे.