‘सणासुदीच्या काळात वीजपुरवठा खंडीत होऊ देऊ नका’ – अमित गावडे

0
289

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – मागील काही महिन्यांपासून निगडी, प्राधिकरणातील नागरिक खंडीत वीजपुरवठ्यामुळे हैराण आहेत. येत्या शुक्रवारपासून गणेशोत्सव सुरु होत आहे. रविवारी गौराई येत आहेत. त्यानंतर नवरात्र उत्सव आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात वीजपुरवठा खंडीत होऊ देऊ नका, अशी मागणी शिवसेना नगरसेवक अमित गावडे यांनी महावितरणकडे केली.

याबाबत महावितरणच्या निगडी कार्यालयातील सहाय्यक अभियंता एस.बी. झोडगे यांना निवेदन दिले. त्यात नगरसेवक गावडे यांनी म्हटले आहे की, मागील काही महिन्यांपासून निगडी, प्राधिकरणातील वीजपुरवठा खंडीत होत आहे. दररोज वीजपुरवठा खंडीत होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. वारंवार वीज जाते. वीजपुरवठा सुरळित होण्यास विलंब लागतो. त्यामुळे नागरिक हैराण झालेत. वीजपुरवठा खंडीत झाल्याबाबत विचारणा केल्यावर दररोज वेगवेगळी कारणे दिली जातात. शॉर्ट सर्किट झाले तर कधी डिपी जळाल्याचे सांगितले जाते.

शुक्रवारपासून गणेशोत्सव सुरु होत आहे. गौराई येत आहेत. त्यानंतर नवरात्र उत्सव आहे. या सणासुदीच्या काळात निगडी, प्राधिकरणातील वीजपुरवठा खंडीत होता कामा नये. वीजपुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यादृष्टीने नियोजन करावे. यंत्रणा राबवावी. कर्मचाऱ्यांना तशा सूचना द्याव्यात. सणासुदीच्या काळात वीजपुरवठा खंडीत झाल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारा नगरसेवक गावडे यांनी निवेदनातून दिला आहे.