शेतकऱ्यांनी ‘नूकसान भरपाई देता की घरी जाता’ हा नारा बुलंद करावा – आदित्य ठाकरे

0
192

शिरूर ,दि.28(पीसीबी) – राज्यात गद्दारीने स्थानापन्न झालेल्या घटनाबाह्य सरकारचे निर्दयीपणे काम चालू असून, लोकसेवा विसरून सत्तेत मश्गुल झालेल्या सत्ताधाऱ्यांचा केवळ राजकारणावर फोकस आहे. सद्यस्थितीत अस्मानी संकटामुळे हवालदील झालेल्या शेतकरी बांधवांना सावरता येत नसेल; तर सरकारने चालते व्हावे”, असा इशारा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज येथे दिला. गावोगावच्या शेतकऱ्यांनी सर्व मंत्र्यांसाठी ‘नूकसान भरपाई देता की घरी जाता’ हा नारा बुलंद करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

परतीचा अवकाळी पाऊस आणि ढगफूटीने झालेल्या नूकसानीची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी गुरूवारी शिरूर तालुक्याचा दौरा केला. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सचिन आहिर, संपर्क प्रमुख अविनाश रहाणे, जिल्हाप्रमुख सुरेश भोर व ज्ञानेश्वर कटके, जिल्हा संघटक संजय देशमुख, उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार, तालुकाप्रमुख सुधीर फराटे व गणेश जामदार, तालुका संघटक कैलास भोसले, उपतालुकाप्रमुख अनिल पवार, शिरूर शहर प्रमुख सुनिल जाधव, युवासेनेचे तालुका संघटक संदीप शिंदे यांच्यासह शिवसैनिक या दौऱ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मलठण, वाघाळे, वरूडे, गणेगाव खालसा, बुरूंजवाडी येथील शेतकऱ्यांशी आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला. मलठण मध्ये शेतकऱ्यांना संबोधित करण्यासाठी स्टेज उभारले होते. मात्र, त्यांनी स्टेजसमोर बसलेल्या लोकांमध्ये बैठक मारून संवाद साधला. वाघाळे व वरूडेच्या अमाप – तनपूरे वस्तीवरील चिखल, पाण्याने भरलेल्या दलदलयुक्त शिवारात आत जाऊन त्यांनी पिकांच्या नासाडीची पाहणी केली. यावेळी मुख्य रस्त्यावर शेतकरी मोठ्या संख्येने थांबले असताना त्यांनी गाडीतून उतरून थेट रस्त्यावर बैठक मारून त्यांच्याशी संवाद साधला. अतिवृष्टी, ढगफूटी आणि परतीच्या अवकाळी पावसाने शेतीचे, पिकांचे आतोनात नूकसान झाल्याने व अद्यापही शेतशिवारांत चिखल – पाणी दिसून येत असल्याने तातडीने महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहिर करावा व शेतकऱ्यांना तातडीने नूकसान भरपाई द्यावी, अशी आग्रही मागणी ठाकरे यांनी केली. ते म्हणाले, “सुरवातीपासूनच धो धो कोसळलेल्या पावसाने जाता जाता देखील शेतकऱ्यांना दगा दिला. अजूनही अनेक शिवारांत, उभ्या पिकांत पाणी आहे.

उघड्या डोळ्यांनी दिसत असलेल्या या स्थितीची शासन प्रतिनिधींनी बांधावर जाऊन पाहणी करावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. शेतकरी बांधवांनीही या परिस्थितीत विचलित न होता आत्महत्येसारखा वेडावाकडा विचार न करता आलेल्या परिस्थितीचा संयमाने आणि जिद्दीने सामना करावा. या समस्येतून मार्ग निघेपर्यंत खुद्ध उद्धव ठाकरे आणि शिवसैनिक आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे असतील. तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या समस्यांच्या सोडवणूकीसाठी प्रयत्न करू. शासन दरबारी शेतकरी बांधवांचा आवाज उठवू.

शेतकरी मोडला असताना, शेती उध्वस्त झाली असताना सरकारचे अस्तित्व कुठेही दिसत नाही. या स्थितीत नैतिकता पाळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मौजमस्ती आणि गंमतबाजीमध्ये मश्गुल असलेल्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा, अशी आग्रही मागणी आदित्य ठाकरे यांनी केले. पन्नास खोके घेऊन ओके झालेले सरकारमध्ये सत्तेचा लाभ घेत आहेत. सरकार एकदम ओके आहे, पण जनता, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार तरूण मात्र ओके नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

अवकाळी पावसाचा तडाखा आणि ढगफूटीने अजूनही शेतशिवारांत पाणी, चिखल आहे. पिके सडली, वाया गेल्याचे वास्तव डोळ्यासमोर दिसत आहे. अशा स्थितीत ओला दुष्काळ जाहिर करण्यासाठी निकषांची अट घालू नये. अनेक ठिकाणी पंचनामे झालेले नाहीत. पंचनामे झालेत तिथले प्रस्ताव शासनदरबारी गेले नाही. जे गेलेत ते मंजूर झालेले नाहीत. त्यामुळे एवढे मोठे नूकसान होऊनही शेतकऱ्याच्या हातात एक पैसादेखील अद्यापपर्यंत पडलेला नाही. अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा हा आवाज घटनाबाह्य असलेल्या सरकारपर्यंत न्यायचा आहे. पाठित खंजीर खुपसून खूर्ची मिळविलेल्यांनी, आमच्याशी गद्दारी करून सत्तेत बसलेल्यांनी किमान महाराष्ट्रातील सामान्य जनतेशी, शेतकरी बांधवांशी तरी गद्दारी करू नये.