शूटिंगदरम्यान हल्लेखोरांचा राडा; माही गिलसह इतर कलाकारांना रॉडने मारहाण

0
403

मुंबई, दि. २० (पीसीबी) – ‘फिक्सर’ या शोचे शुटिंग मीरा रोड या ठिकाणी सुरू होते. यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी अभिनेत्री माही गिल आणि इतर कलाकारांना मारहाण केली आहे. निर्माता साकेत सावनी यांनाही या दरम्यान दुखापत झाली आहे. पोलिसांनीही यावेळी अज्ञात गुंडाची साथ दिल्याचा आरोप माही गिलने केला आहे. साकेत सावनी आणि माही गिल यांचा एक व्हिडिओ दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे ज्यामुळे ही सगळी माहिती समोर आली आहे. बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

मीरा रोड येथे शुटिंग करण्यासाठी आम्ही लोकेशन मॅनेजरला पैसे दिले. तसेच या ठिकाणी शुटिंग करता यावे म्हणून आम्ही ज्या परवानग्या लागतात त्याही काढल्या आहेत. तरीही संध्याकाळी चार ते साडेचारच्या दरम्यान दारू प्यायलेले काही लोक सेटवर आले. त्यांनी या शुटिंगसाठी आम्हाला का विचारले नाही असे म्हणत आम्हाला आणि सेटवरच्या इतरांनाही लाठ्याकाठ्यांनी आणि रॉडने मारहाण करण्यास सुरूवात केली असे साकेत सावनी यांनी म्हटले आहे.

आमच्या शुटिंगमध्ये कलाकारांना आणि इतर कर्मचाऱ्यांना मारहाण केली. एवढेच नाही तर माही गिल यांनाही मारले. आमचे काहीही ऐकून घ्यायला ते तयार नव्हते. आमच्या दिग्दर्शकाला, डीओपीला, कलाकारांना सगळ्यांना या चौघांनी मारहाण केली. एखाद्या जनावराला मारतात त्याप्रमाणे इथे मारहाण करण्यात आली असा प्रकार मी पहिल्यांदा पाहिला असे माही गिलने म्हटले आहे. तसेच आम्ही हा सगळा प्रकार पोलिसांकडे यासाठी घेऊन जात नाही कारण पोलीस स्वतःच सांगत होते की यांना मारा असाही आरोप माही गिलने केला आहे.