औद्योगिकनगरीत साकारणार राष्ट्रपिता महात्मा गांधींचे स्मारक

0
466

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार, त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार  करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात महात्मा गांधी यांचे स्मारक उभारण्यासाठी आदित्य बिर्ला ग्रुपने पुढाकार घेतला असून स्मारकाचा संपूर्ण खर्च आणि देखभाल बिर्ला ग्रुप करणार आहे. या स्मारकासाठी लागणारी २ एकर जागा महापालिका देणार आहे. मात्र, या स्मारकाचा ताबा महापालिकेकडे राहणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला आज (बुधवार) स्थायी समितीने मंजुरी दिली.

शहरात महात्मा गांधी यांच्या कार्याचा, विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी महात्मा गांधीचे स्मारक उभारण्यासाठी आदित्य बिर्ला ग्रुपने महापालिकेकडे २ एकर जागेची मागणी करणारे पत्र १२ डिंसेबर २०१८ रोजी पाठविले होते. या पत्रात स्मारकाचा बांधकाम खर्च आणि देखभाल दुरूस्ती खर्च आदित्य बिर्ला ग्रुपच्या वतीने करण्यात येईल. तसेच ही जागा कोणत्याही व्यावसायिक कारणासाठी उपयोगात आणली जाणार नाही, असे नमूद केले आहे.

या जागेचा आणि स्मारकाचा ताबा महापालिकडे राहील, असेही या पत्रात स्पष्ट केले आहे. यावर महापालिकेने पिंपरी येथील सिटी सर्व्हे क्रमांक ४ हजार ६९४ मधील मंजूर बांधकाम रेखांकनातील सुविधा भूखंड आणि महावितरणाच्या उपकेंद्राकरीता आरक्षित असलेले ६ हजार ८०६ चौरस मीटर क्षेत्र स्मारकासाठी आदित्य बिर्ला ग्रुपला देण्यात येणार आहे.