शिवसेना आणि भाजपात सगळे समसमान पाहिजे- उद्धव ठाकरे

0
424

मुंबई, दि. २० (पीसीबी) – भाजप आणि शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर दावा केला जात असतानाच शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर आले. या दोन्ही नेत्यांनी आपआपल्या भाषणात सूचक विधाने केली.

आपल्या भाषणाच्या शेवटी उद्धव ठाकरे यांनी हे विधान केल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. मी कार्यक्रमाबद्दल बोलतोय असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. पण त्यांचा अप्रत्यक्ष इशारा सत्तेतल्या समसमान वाट्याकडे आहे, हे उपस्थित कार्यकर्त्यांना कळायला वेळ लागला नाही. एका युतीची पुढची गोष्ट महाराष्ट्राच्या व्यासपीठावर असून संपूर्ण देश बघतोय असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेना आणि भाजपाचे ठरले असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. वाघाच्या जबड्यात घालूनी हात म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची भाषा आज बदलली होती. वाघ आणि सिंह एकत्र आले तर जंगलात त्यांचीच सत्ता असते असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर शिवसेना आणि भाजपात सगळे समसमान पाहिजे, असे सूचक विधान उद्धव ठाकरेंनी केले. मुख्यमंत्रिपदावर सेनेचाही ५० टक्के हक्क आहे असे तर उद्धव ठाकरेंना सूचवायचे नव्हते ना? अशी आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.