शिवाजीनगर येथील एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे मळवंडी गावात राष्ट्रीय सेवा योजना शिबीर उत्साहात

0
822

पुणे, दि. २१ (पीसीबी) – शिवाजीनगर येथीलऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी शिबीर मावळ तालुक्यातील मळवंडी येथे उत्साहात पार पडले. या शिबिराअंतर्गत श्रमदानाद्वारे विकासकामांपासून ते सुशोभीकरणापर्यंत अनेक कामे करून मळवंडी गावाचा कायापालट करण्याचे काम स्वयंसेवकांनी केले.

या शिबीराचे ९ जानेवारी रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. बोरणे, मावळ पंचायत समिती सभापती गुलाब म्हाळसकर यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसभापती शांताराम कदम, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राजू भेगडे, जिल्हा परिषद सदस्य गणेश धानिवले, कार्यक्रम अधिकारी डॉ. एन. एन. शेजवळ, सरपंच रंजना ढोरे, उपसरपंच सुवर्णा ढोरे, ग्रामसेवक बी. पी. पाटील आदी उपस्थित होते.

या शिबिरांतर्गत गावांमधील सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक घरासाठी शोषखड्डे बनवण्यात आले. तसेच नारळ, चिंच,आंबा यासारख्या उपयुक्त झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. गावातील सर्व घरांना एकाच रंगाने रंगवून राष्ट्रीय एकात्मता व एकता जपण्याचे काम करण्यात आले. गावात साफसफाई करून स्वच्छता अभियानाचा संदेश देण्यात आला. मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष विनय रमा रघुनाथ, साद संस्थेचे संस्थापक हरीश बुटले, शेतीतज्ज्ञ मनोहर खाके, अर्थतज्ज्ञ अजित अभ्यंकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. तसेच प्रसिध्द भारूडकार अनिल केंगार यांनी उत्कृष्ट सादरीकरण, हावभावाद्वारे थेट गावकऱ्यांच्या मनाशी संवाद साधत समाजातील नीतिची जाणीव करून दिली.

मळवंडीतील जिल्हा परिषध शाळेत विविध विकासकामे करण्यात आली. शाळेला दोन संगणक भेट देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रशिक्षण आणि इंग्रजी बोलण्याचे वर्ग घेण्यात आले. शाळेत विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. ड्रोनचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. सांस्कृतिक क्षेत्रात विद्यार्थ्यांची आवड वाढावी यासाठी त्यांना पियानोचे प्रात्यक्षिक दाखवून प्रोत्साहित करण्यात आले. शाळा व अंगणवाडीमध्ये पेंटींगचे काम करून सुशोभित करण्यात आले. शाळेतील स्वछतागृहांसाठी शोषखड्डा बांधून देण्यात आला.

राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी तिकोना किल्ल्यावर येथे स्वच्छता अभियान राबवून गडसंवर्धनाचे काम केले. गावकऱ्यांसाठी भजन व कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करून आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न स्वयंसेवकांनी केला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून मनोरंजना बरोबरच जनजागृतीचे काम केले. मकरसंक्रांतीच्या दिवशी गावकऱ्यांनी व स्वयंसेवकांनी एकमेकांना तिळगूळ देत शुभेच्छा दिल्या. त्यातून गावकऱ्यांसोबतचे ऋणानुबंध मजबूत झाले.