हिंजवडीत संगणक अभियंत्याकडून अभियंता तरुणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न

0
985

हिंजवडी, दि. २१ (पीसीबी) – एकतर्फी प्रेमातून संगणक अभियंत्याने अभियंता तरुणीला चेन्नई येथून बोलावून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.  ही धक्कादायक घटना हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत घडली.

याप्रकरणी पिडित अभियंता तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पिनाक नेपाल मुजुमदार (वय ३०, रा. मारुंजी) या तरुणाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिनाक मुजुमदार आणि पिडित तरुणी हे एकमेकांच्या ओळखीचे असून दोघे मित्र आहेत. २०१२ साला दोघेही चेन्नई येथे एकत्र नोकरी करत होते. परंतु,२०१७ ला मुजुमदार हा हिंजवडी येथील नामांकित कंपनीत संगणक अभियंता म्हणून कार्यरत झाला. दोघांचे फोन आणि मेसेजद्वारे केवळ मित्र या नात्याने बोलणे सुरू होते. मध्यंतरी आरोपी मुजुमदारचा वाढदिवस झाला तेव्हा देखील तरुणी हिंजवडी येथे आली होती. मात्र,डिसेंबर महिन्यात चेन्नई येथून तरुणीला मुजुमदारने राहत्या घरी बोलावून ‘तुझ्यावर खूप प्रेम करतो, तू काहीच उत्तर देत नाहीस’ असे म्हणून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तरुणी घाबरलेल्या अवस्थेत त्याच रात्री चेन्नईला निघून गेली. दरम्यान,रविवारी (दि.२०) याप्रकरणी तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी पिनाक सध्या फरार आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर तपास करत आहेत.