शिवसेनेच्या नगरसेवकाने पातळी सोडली; एकनाथ पवार यांच्यावर लुच्चा, लायकी नसलेला, भ्रष्टाचारी अशा शब्दांत वैयक्तिक टिका

0
799

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – मावळ लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेला विरोध शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. भाजप पदाधिकाऱ्यांच्या विरोधाला शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रक काढून उत्तर दिले होते. त्याला सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी प्रत्युत्तर दिले होते. त्यात त्यांनी खासदार बारणे यांच्याविषयी जनतेतच नाराजी असल्याचे म्हटल्याने शिवसेनेला ते चांगलेच झोंबले आहे. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक अॅड. सचिन भोसले यांनी बुधवारी (दि. १३) एकनाथ पवार यांच्या विरोधात प्रसिद्धीपत्रक काढून अगदी खालच्या पातळीवरची वैय्यक्तिक टिका केली आहे. नगरसेवक भोसले यांनी पवार यांच्याविषी लुच्चा, लायकी नसलेला, भ्रष्टाचारी असे शब्द वापरले आहेत. मात्र एकनाथ पवार यांनी अशी खालच्या पातळीवरची टिका करण्याची आमची संस्कृती नसल्याचा पलटवार केला आहे.

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी हे रविवारी पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी महापालिकेतील भाजपचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेवक नामदेव ढाके, शीतल शिंदे यांच्यासह पक्षाच्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत एक निवेदन दिले होते. युती झाली तर मावळ लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा. परंतु, युतीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला आणि शिवसेनेने विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा उमेदवारी दिली, तर भाजपचे कार्यकर्ते बारणे यांचे काम करणार नसल्याचे निवेदनात म्हटले होते. बारणे यांनी वेळोवेळी भाजपच्या नेतृत्वावर आणि विकासकामांवर टिका केली आहे. तसेच त्यांना महापालिका निवडणुकीत चार नगरसेवक सुद्धा निवडून आणता आले नाहीत, असेही भाजप पदाधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटले होते.

भाजप पदाधिकाऱ्यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांना दिलेले हे निवेदन पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रक काढून बारणे हे लोकप्रिय नेते असल्याचे सांगत भाजपवर टिका केली होती. तसेच राष्ट्रवादीला अनुकूल भूमिका घेतली जात असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते. त्याला सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी प्रसिद्धीपत्रक काढून बारणे यांच्याविषयी जनतेतच नाराजी असल्याचे सांगितले. बारणे हे उमेदवार असले आणि त्यांचा निवडणुकीत पराभव झाला, तर शिवसेनेसोबत भाजपचेही प्रचंड नुकसान होणार असल्याचे पवार यांनी म्हटले. तसेच काँग्रेस व राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले बारणे आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी शिवसेनेच्या शहर संघटनेवर ताबा घेतला असल्याची टिका पवार यांनी केली होती.

एकनाथ पवार यांनी केलेली ही टिका शिवसेनेला चांगलीच झोंबली आहे. त्यामुळे शिवसेनेचे थेरगावचे नगरसेवक अॅड. सचिन भोसले यांनी बुधवारी (दि. १३) एक प्रसिद्धीपत्रक काढून एकनाथ पवार यांच्यावर अगदी खालच्या पातळीवरची टिका केली आहे. भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात एकनाथ पवार यांच्याबाबत लुच्चा, लायकी नसलेला, भ्रष्टाचारी असे शब्द वापरले आहेत. पवार यांना लायकीपेक्षा मोठे पद मिळाल्याने ते सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करत आहेत. ते डोळ्यावर पट्टी बांधून काम करतात. म्हणूनच महापालिकेतील भ्रष्ट कारभार, जनतेच्या पैशाची चाललेली लूट याऐवजी पवार यांना स्वप्नातही बारणे दिसतात, अशी टिका नगरसेवक भोसले यांनी केली आहे.

या टिकेला एकनाथ पवार यांनीही उत्तर दिले असून, मावळ मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत भाजपने वास्तव मांडले असून, ते सत्यच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून श्रीरंग बारणे हे तुल्यबळ उमेदवार ठरणार नाहीत, हे लहान मूल सुद्धा सांगेल. “गिरे तो भी टांग ऊपर”, अशा अविर्भावात शिवसेना वागायला लागली तर त्याचा फटका भाजपला सुद्धा सोसावा लागणार आहे. हे वास्तव समजून न घेता खासदार बारणे यांचे चमचे पातळी सोडून टिका करू लागले आहेत. अशी खालच्या पातळीवरची टिका आम्हालाही करता येते. परंतु, ती आमची संस्कृती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.”