विविध मागण्यांसाठी तिरमल क्रांती दलाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन    

0
688

पिंपरी, दि. (पीसीबी) – वंचित तिरमल समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यात यावा. तसेच समाजाच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तिरमल क्रांती दलाने पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.  

याबाबत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यात तिरमल समाज वास्तव्यास असून या समाजाची लोकसंख्या ५ लाखांच्या घरात आहे. तिरमल ही जमात नंदीवाले जमातीची तत्सम जात म्हणून दर्शविण्यात आली आहे. या समाजाची बोली भाषा मराठी, अहिराणी असून बालाजीची पूजा, मांडणी व पोथी वाचणे, देवांच्या मूर्त्या विकणे, शेत मजुरी, नंदीबैलांचा खेळ करणे, जानवी जोड विकणे आदी व्यवसाय हा समाज करत आहे.

स्वातंत्र्य मिळून ७० वर्षांचा काळ लोटत आला तरी, आजही तिरमल समाज उदरनिर्वाहासाठी व पोटा पाण्यासाठी रानोरान भटकत आहे. त्यामुळे समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. समाज सतत भटकत असल्याने शासकीय कागदपत्रे, जात प्रमाणपत्रे, जन्म दाखला, मृत्यू दाखला मिळवण्यात अनेक अडचणी येतात. समाजाचा आर्थिक, सामाजिक विकास झालेला नाही.

तरी कोतवाल पुस्तकात जातीसंबंधी केलेल्या चुकीच्या नोंदी दुरूस्त करण्यात याव्यात. केंद्र सरकारच्या संभाव्य आरक्षणाच्या तिसऱ्या सुचित समाजाचा समावेश करण्याबाबत शिफारस करण्यात यावी. जात पडताळणीची जाचक अट रद्द करण्यात यावी.  महाराष्ट्र सरकारच्या भटक्या विमुक्त महामंडळावर तिरमल समाजाला कायम  प्रतिनिधित्व देण्यात यावे. जिल्ह्याच्या ठिकाणी समाज मंदिरासाठी भूखंड राखीव ठेवण्यात यावेत.  बेरोजगार तरूणांना लघु उद्योगासाठी कर्ज योजनेचा लाभ मिळवून देण्यात यावा. बेघरांना घरकुल योजना राबविण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी राज्याध्यक्ष उत्तम मोकाशी, पुणे जिल्हाध्यक्ष विशाल हाके, पुणे जिल्हा सचिव लक्ष्मण बोने अशोक कोरपे, निलेश हाके, गोविंद चुनचुने, उमेश हाके यांच्यासह तिरमल समाज बांधव उपस्थित होते.