”शिवसेनेचे” 12 आमदार भाजपाच्या संपर्कात..

0
428

नांदेड, दि. ९ (पीसीबी) – मागील काही दिवसांपासून विरोधक सतत महाविकास आाघाडी सरकारवर निशाणा साधत असल्याचं पाहायला मिळत नाही. अनेकवेळा महाविकास आघाडी सरकार जास्त दिवस टीकणार नाही असे आरोप करण्यात आले आहेत. त्यातच आता भाजपच्या नेत्याने केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी शिवसेनेचे 12 आमदार आमच्या संपर्कात असून लवकरच सत्तापालट होइल, असा दावा केला आहे. शिवाय, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली असली तरी आता लवकरच हे पक्ष वेगळे होतील, असंही ते म्हणाले आहेत.

नांदेड जिल्ह्यातील देगलोर बिलोली विधानसभा लवकरच पार पडणार आहे. या निवडणुकीत भाजपचे सुभाष साबणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत बबनराव लोणीकर बोलत होते. त्यावेळी त्यांनी हा दावा केला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपला आघाडी सरकारपेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या. शिवाय मागील अनेक दिवस महाविकास आघाडीमधील नेत्यांचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं पहायला मिळालंय. त्यामुळे लोणीकरांच्या या दाव्यानंतर चांगलीच चर्चा रंगली आहे.