लोणावळ्यातील शक्तीपीठ कार्ला गडावरील कुलस्वामीनी आई एकविरा देवी

0
582

लोणावळा, दि. ९ (पीसीबी) : लोणावळा शहरापासून अवघ्या आठ किमी अंतरावर असलेल्या कार्ला डोंगरावरील प्राचिन बुध्द लेण्यांच्या सानिध्यात अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामीनी व कोळी आगरी बांधव‍ांचे आराध्य दैवत असलेली आई एकविरा देवी स्थानापन्न आहे.

संत एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये देवीचे वर्णन करताना ‘ते शिवशक्तीरुपें दोनी । नेऊन मिरवे एकपर्णी । एकपणे आली गुर्विणी । प्रसवे एकपर्णी एकविरा ।। ते एकरुपें एकविरा । प्रसवली बोध – फरशधरा । जयांचा का दरारा । महाविरा अभिमानियां ।। तेणें उपजोनी निवटिली माया । आज्ञा पाळुनी सुख देपितया । म्हणोनी तो जाहला विजया । लवलाह्यां दिगमंडळी ।। जो वासनासहस्त्रेबाहो । छेदिला सहस्त्रार्जुन – अहंभावो । स्वराज्य करुनियां पाहा हो । अर्पी स्वयमेवो स्वजातियां ।। असे म्हंटले आहे.

महाराष्ट्रातील अतिशय जागृत देवस्थान असलेल्या एकविरा देवीचे मंदिर कार्ला गडावर आहे. मंदिर‍ाच्या शेजारी बुध्दविहार असल्याने परिसराची रम्यता, अल्हाददायीपणा, बौध्दकालिन कार्ले लेणी व तेथिल वरदायीनी एकविरा आईचे पुरातन देवालय इतिहासापासून प्रसिध्द आहे. इ.स. पुर्व पहिल्या शतकात या ठिकाणी शिल्प कोरण्यात आली आहेत. या एक चैत्यगृह आहे. तेथिल सभागृह 125 फुट लांब व 45 फुट रुंद असून त्याठिकाणी मंडपातील स्तंभावर कोरिव नक्षीकाम केलेले आहे. सिंहस्तंभ, कोरिव काम, अंधारी गुंफा पाहण्याकरिता याठिकाणी पर्यटकांची देखिल मोठी वर्दळ असते. भारतीय पुरातत्व विभागाने या ठिकाणाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे.

कार्ला गडावरील शिल्पे ही उशवदत्त शकाधिपती राजाने सन 120 साली बनवली असल्याचा इतिहासात उल्लेख सापडतो. 1866 साली या मंदिराचा जिर्णोध्दार झाल्याचा एक माहितीपर शिलालेख याठिकाणी आहे. तर मंदिर‍ाच्या घंटेवरील 1857 ही अक्षरे येथिल प्राचिनतेची साक्ष देतात. अशा या पुरातन ठिकाणी अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामीनी भाविक भक्तांकरिता स्थानापन्न आहे.

ज्याने 21 वेळा पृथ्वी जिंकली असा महानयोध्दा असलेल्या परशुरामाची आई रेणुका हीच एकविरा या नावाने ओळखली जाते. भारतात रेणूकीची जी स्थाने आहेत ती एकविरा देवीची स्थाने म्हणून ओळखली जातात. महाराष्ट्रातील थोर संत एकनाथ महाराजांची एकविरा ही कुलदेवता आहे. महाराष्ट्रातील ठाकरे कुठुंबियांची कुलस्वामीनी म्हणून देवीला विशेष महत्व आहे. आई एकविरा मातेची कहाणी ही स्कंदपुराण, महाभारत, गणेशपुराण, कालीपुराण या ग्रंथामधून वर्णन केलेली आहे. प्रत्येक ठिकाणी आईच्या वेगळेपणाचे वेगवेगळे संदर्भ मिळतात म्हणूनच आई एकविरेचे चरित्र अभ्यासकांसाठी गूढ मानले जाते. भाविक‍ांना सदैव तारणारी, नवसाला पावणारी व सदैव कृपेची सावली होऊन पाठराखण करणारी जगतमाऊली असलेली आई एकविरा म्हणजे माया, दया, क्षमा, शांती व समाधानाचे स्थान आहे. कान्यकुब्ज येथिल राजा याने पुत्रकामेष्ठी यज्ञ केला होता. महादेवांच्या कृपा आर्शिवादाने त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले तिचे नाव रेणूका, पुढे रेणूकाचा जमदाग्नी ऋषींच्या सोबत स्वंयवर झाला. त्यांना पाच मुलगे झाले. रुमावंत, सुशेषा, वसु, विश्वावसु व परशुराम. यातील परशुराम याने तब्बल 21 वेळा पृथ्वी निःशस्त्र करण्याचा पराक्रम केला. म्हणून अशा एक विर पुत्राची आई म्हणून रेणूका माता एकविरा या नावाने प्रसिध्द झाली. तसा वरच भगवान शिवशंकरांनी दिला होता.

नवसाला पावणारी, कोळ्याच्या हाकेला धावणारी जलदेवता म्हणून एकविरा देवी समस्त कोळी, आग्री, सिकेपी, सोनार अशा अठरा पगाड जातीची कुलस्वामीनी आहे. देवीला सर्वच समाजात वेगळे स्थान असून देशभरातून विविध राज्यांतून भाविक देवीच्या दर्शनाकरिता येत असतात. देवीचे व मंदिराचे वेगळेपण शब्दात मांडणे अवघड असले तरी पुरातन लेण्यांमधील तिचे स्थान, प्राचिनता आणी तिचे लोभसवाणे रुप यामुळे देवीचे महत्व काही वेगळेच आहे. देवीच्या दर्शनाकरिता डोंगर चढून वर जावे लागते. पुर्वी गडाचा पायथा ते मंदिर असा हा पायी प्रवास करावा लागत आहे. देवस्थानच्या माध्यमातून याठिकाणी सध्या अर्ध्या डोंगरापर्यत वाहने येण्याचा मार्ग तयार करण्यात आल्याने पाचपायरी मंदिरापर्यत भाविक‍ांना वाहन‍ांनी येणे शक्य झाले आहे. हा डोंगर चढत असताना दिसणारे इंद्रायणी नदीचे मनमोहक दृष्य, जेवरेवाडी येथिल गजानन महाराजांचा मठ, समोरच्या ठेकडीवरील वनोबा महाराजांचे स्थान आईचे माहेरघर असलेल्या देवघरातील देवालये, लोहगड, विसापुर, तुंग, तिकोणा हे किल्ले मनाला सुखावतात. गडावर चढून गेल्यानंतर वार्‍याची छानशी झुळुक भाविक‍ांचा सर्व थकवा दुर करते. गडावरील एकविरा देवीचे स्थान हे स्वयंभु आहे. तेजस्वी नेत्र असलेल्या या देवीच्या मुखमंडळावरील हास्य सौम्यता व प्रसन्नता आहे.

एकविरा देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून कार्ला गडावर भाविकांच्या सुखसोयी व सुलभ दर्शनाला प्राधान्यक्रम देत अत्याधुनिक पध्दतीने रेलिंगची व्यवस्था, यात्रा काळात महिला व व्हिआयपी करिता सर्वत्र दर्शनर‍ंग, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, दर्शनाला जाताना, पाय धुण्याची व्यवस्था, गडावर हायमस्ट दिवे, विज गेल्यानंतर खोळंबा होऊ नये याकरिता जनरेटर सुविधा, 20 खोल्यांची सुसज्य धर्मशाळा, पायर्‍या ते वाहनतळ विजेचे पोल, सुरक्षेकरिता सिसिटिव्ही कॅमेरे, डोंगरावरील सुटे झालेले दगड खाली पडून भाविक‍ांना इजा होऊ नये याकरिता मंदिराच्या बाहेर सुरक्षा जाळीचे आच्छादन आदी कामे करण्यात आली आहे. एकविरा देवीच्या गडाचा काही भाग हा वन विभागाच्या तर काही भाग हा भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येत असल्याने याठिकाणी विकासकामे करणे म्हणजे तारेवरची कसरत असताना देखिल देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून याठिकाणे कामे केली गेली आहेत. देवीची प्रचिती व प्रसिध्दी देखिल मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने याठिकाणाचे महात्म व जागृतते पुढे नतमस्तक होण्याकरिता वर्षभर भाविक‍ांची गडावर वर्दळ वाढली आहे.