शिवसेनेची ‘मातोश्री’वर मंगळवारी बैठक; युतीचा निर्णय होणार ?  

0
932

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची ‘मातोश्री’वर  मंगळवारी (दि.५)  एक महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत शिवसेना-भाजप युतीबाबत निर्णय  होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

‘मातोश्री’वर मंगळवारी सकाळी ११ वाजता ही बैठक  होणार आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. तसेच निवडणुकीतील रणनितीवर चर्चा करणार आहेत.  त्याचबरोबर लोकसभा मतदारसंघनिहाय राजकीय स्थितीचा आढावा घेणार आहेत. लोकसभेच्या उमेदवारांबाबतही चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना बोलावण्यात आले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून युतीसाठी भाजपने आग्रह  धरला आहे. मात्र, शिवसेनेने अद्याप आपले पत्ते उघड केलेले नाहीत. आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. त्यामुळे युतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. युतीसाठी मागू लागू नको, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी वारंवार म्हटले आहे.