चिखली संतपीठातील भ्रष्टाचारावरून राष्ट्रवादीचा महासभेत अभूतपूर्व गोंधळ  

0
855

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – चिखली येथे उभारण्यात येणाऱ्या संतपीठाच्या  उभारणीसाठी राबविलेल्या निविदा प्रक्रियेत रिंग आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी (दि.४) अभूतपूर्व गोंधळ घातला. महापौर राहुल जाधव यांनी गोंधळातच संतपीठ उभारणीचा विषय मंजूर केला. त्यामुळे राष्ट्रवादीने पुन्हा गोंधळ घातला. या गोंधळाच्या परिस्थितीमुळे सत्ताधारी भाजपला सभागृह एक तासासाठी तहकूब करावे लागले.  

महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. महापालिकेच्या वतीने चिखली येथे संतपीठ उभारण्यात येणार आहे. त्यासाठी राबवलेल्या निविदा प्रक्रियेत रिंग आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. संतपीठाचा विषय सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी होता. त्याविषयावर चर्चा सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी भ्रष्टाचाराचा पुरावा म्हणून एक ऑडिओ क्लिप सभागृहात ऐकविण्याचा प्रयत्न केला. महापौरांनी त्याला आक्षेप घेत  ऑडिओ क्लिप ऐकविण्यात येणार नसल्याचे सांगितले. भ्रष्टाचाराचे  कागदोपत्री पुरावे असतील, तर ते सादर करण्याचे आव्हान त्यांनी केले.

परंतु, दत्ता साने यांनी ती ऑडिओ क्लिप ऐकविण्याचा प्रयत्न केला. त्यावरून महापौर आणि साने यांच्यामध्ये खडाजंगी झाली. त्यानंतर महापौरांनी साने यांना बोलू दिले नाही. त्यावरून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला. महापौरांच्या आसनासमोरील मानदंड पळविण्याचा प्रयत्न केला. त्यावरून सभागृहात प्रचंड गोंधळ झाला. या गोंधळातच महापौरांनी संतपीठ उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यावरून पुन्हा एकदा साने आणि महापौर यांच्यात खडाजंगी झाली. सभागृहात वाढलेला गोंधळ पाहून महापौर आणि आयुक्त आपल्या आसनावरून उठून गेले. अखेर नगरसचिव उल्हास जगताप यांनी सभागृह एक तासासाठी तहकूब करण्याचे जाहीर केले.